बदलापूर शहरात खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने होम प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या होम प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली होती. मात्र काम सुरू झाल्यावर जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे काम रखडलेल्या अवस्थेत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून प्लॅटफॉर्मचे काम थांबल्याने बदलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली होती. अंबरनाथ स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या नंतर सुरू करूनदेखील ते काम पूर्ण झाले. मात्र बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मचे काम न झाल्याने यासंदर्भात नाराजीचा सूर उमटत होता. या प्रकरणी खासदार पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून उर्वरित काम तत्काळ करण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करीत आता होम प्लॅटफॉर्मच्या उर्वरित कामाला सुरुवात केली आहे. बदलापूर पालिकेचे माजी गटनेते राजन घोरपडे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये हा प्रश्न कायमचा निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
होम प्लॅटफॉर्मच्या रखडलेल्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:39 AM