राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत विदेशी मद्यासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:11 PM2020-11-19T23:11:07+5:302020-11-19T23:40:09+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘मिशन आॅल आऊट’ अंतर्गत राबविलेल्या मोहिमेमध्ये ठाणे विभागीय भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली गावात बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या अनिल पाटील आणि सुरेश फडके या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी मद्यासह पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या ठाणे विभागीय भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली गावात ‘मिशन आॅल आऊट’ अंतर्गत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाºया अनिल पाटील आणि सुरेश फडके या दोघांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ७२० सिलबंद बाटल्यांमधील विदेशी मद्यासह पाच लाख ४५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के. बी. उमप, कोकण विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा शर्मा यांनी जाहीर केलेल्या मिशन आॅलआऊट अंतर्गत अवैध तसेच बनावट मद्याविरुद्ध कारवाईचे आदेश ठाण्याच्या पथकांना दिले आहेत. त्याच अनुषंगाने ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, अनंता पाटील, जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, केतन वझे, सुदाम गिते, वैभव वामन आणि वाहन चालक सदानंद जाधव आदींच्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी पाळत ठेवली. त्यावेळी अंबरनाथमधील कुंभार्ली गावातील कुंभार्ली वावजे रस्त्यावर एक व्यक्ती एका मोटारकारमधून एक बॉक्स दुचाकीवर ठेवतांना आढळला. या दोन्ही वाहनांची या भरारी पथकाने तपासणी केली असता, त्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ७२० सिलबंद केलेल्या बाटल्या मिळाल्या. तिथे असलेल्या अनिल पाटील आणि सुरेश फडके यांच्याकडून १५ बॉक्समधील हे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. त्यांच्याकडील मोटार कार आणि मोटारसायकलसह पाच लाख ४५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट विदेशी मद्याच्या बेकायदेशीर विक्रीमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूलामध्येही मोठया प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.