ठाणे : सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, अद्यापही खातेवाटपावरुन गुºहाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.
ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. १८आमदारांच्या जिल्ह्यात सध्या ९ भाजप, ५ शिवसेना, २ राष्ट्रवादी, १ मनसे, समाजवादी १ अपक्ष आमदार आहेत. त्यानुसार आता शिवसेनेतील पाच पैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
परंतु, सर्वांच्या मर्जीखातीर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू असल्याने महत्त्वाच्या खात्यांचीही अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदेच्या वाटेला कोणते खाते येणार याकडे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कायम राहिल, असे बोलले जात आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम, किंवा आरोग्य खातेही त्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे सर्वाधिक मतांनी निवडून येणारे आणि हॅट्रिक साधणारे प्रताप सरनाईक हेदेखील मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. त्यांना कॅबिनेट नाही निदान राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांनीही आता मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात आहेत, त्यामुळे फाटकांवर कृपा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचीही राज्यमंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.
तिकडे मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी आव्हाड यांची पोस्ट सध्या फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील इतर आमदारांनी मात्र या सर्वांतून काहीशी माघार घेतल्याचेच दिसत आहे. असे असले तरी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहे.