विषय सभापती बिनविरोध, सेना-राष्टÑवादीकडे प्रत्येकी दोन समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:50 AM2018-01-31T06:50:59+5:302018-01-31T06:51:09+5:30
ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्टÑवादीने एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित केली आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मंगळवारी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली.
ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्टÑवादीने एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित केली आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मंगळवारी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी भाजपाच्या सदस्यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षांचे चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. यामध्ये बांधकाम व महिला बालकल्याणवर शिवसेनेचे तर समाजकल्याण व कृषी समितीवर राष्टÑवादीचे उमेदवार सभापतीपदी घोषीत करण्यात आले.
नियोजन भवनमध्ये या चार विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी सुदाम परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडली. दरम्यान आ. पांडुरंग बरोरा यांचे चिरंजीव निखील बरोरा यांची समाजकल्याण समिती सभापतीपदी निवड झाली.
वाढदिवसानिमित्त सभापतीपदाची अनोखी भेट निखील यांना मिळाल्याचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर शिवसेनेच्या भिवंडीच्या रांजणोली येथील दर्शना ठाकरे यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड झाली. उर्वरित बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांची तर कृषी व पशुसंवर्धन समितीपदी राष्टÑवादीच्या उज्वला गुळवी यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, या दोन्ही समिती सभापतींची नावे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुमारे १५ दिवसांनी घोषित होणार आहेत.
जिल्हा परिषदेवर प्रथमच सत्तेवर आलेल्या शिवसेनेने राष्टÑवादीशी युती करून सत्ता प्रस्तापित केली आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवू नये म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह राष्टÑवादीलाही सत्तेत समान संधी दिल्याचे दिसते आहे.
सेनेकडे अध्यक्षपदासह दोन सभापती पदे
शिवसेनेने स्वत:कडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासह दोन सभापती पद ठेवले आहेत. यामध्ये बांधकाम व आरोग्य समितीचे महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय राष्टÑवादीलादेखील उपाध्यक्षपद देऊन दोन सभापती पद मिळाले आहेत. यापैकी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडे स्थायी समिती व शिक्षण समिती ही महत्त्वाची खाती आहेत. जिल्हा परिषदेच्या या सत्तेमध्ये शहापूरला शिवसेनेच्या मंजुषा जाधव यांना अध्यक्ष व बरोरा यास सभापतीपद मिळाले.
मुरबाडला पवार यांच्या रूपाने एक उपाध्यक्षपद प्राप्त झाले असून भिवंडी तालुक्याला मात्र तीन सभापती पदे मिळाली आहेत.