मीरा रोड - दुर्मिळ असलेल्या "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर" या स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निदान करत एका 62 वर्षीय आफ्रिकन महिलेवर मीरा रोडच्या एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली .
सुदान या देशाची नागरिक असलेली विडात या ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड येथील एका रुग्णालयात भरती झाल्यावर तिच्या आधुनिक पद्धतीने वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या स्वादुपिंडाच्या टोकावर कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा झाल्यावर त्यावर तातडीने उपचार करणे फार गरजेचे आहे.
पोट व आतड्यांचे शल्य विशारद डॉ. इमरान शेख म्हणाले , "गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला काविळीमुळे त्रास होत होता ही कावीळ कमी करण्यासाठी यकृतामध्ये स्टेण्टचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या महिलेची मेडिकल हिस्टरी समजून घेतल्यावर तसेच सीटी स्कॅन केल्यावर "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर" हा दुर्मिळ कर्करोग झाल्याचे समजले . हा फार दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा कर्करोग आहे.
कॅन्सरचे निदान झाल्यावर आम्ही स्वादुपिंडाचा पुढील भाग, छोट्या आतड्याचा काही भाग, बाईल डक्ट (यकृताशी संबंधित भाग ) गॉल ब्लॅडर हे अवयव काढून आम्ही स्वादुपिंड आणि पित्तनलिका लहान आतडी संबंधित जटिल पुनर्रचना केली असून तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. अशा प्रकारची शल्यचिकित्सा वैद्यकीय क्षेत्रात फार कौशल्याची समजली जाते. या शल्यचिकित्सेत ब्लड ट्रांसफ्युजनची गरज भासली नसून आम्ही छोट्या आतडीची यशस्वीरीत्या पुनर्रचना केली आहे."
स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर व धोक्याची असते. यामुळेच रुग्णाचे आयुष्य सीमित असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात व डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु एक-दोन आठवडय़ांत कावीळ उतरली नाही तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते असे डॉ . शेख म्हणाले . तंम्बाखू, मद्यपान,वाढते वजन, आनुवंशिकता, डायबेटीस, जीवनशैलीतील घातक बदल ही कारणे स्वादुपिंडातील कर्करोगास कारणीभूत ठरतात.