ठाणे - बीएसयुपी योजनेतील गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला होता. ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार मनसेने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटीसा काढल्या आहेत. मात्र केवळ नोटीसा काढून न थांबता पालिका प्रशासनाने या बेकायदा भाडेकरूंचे 'आश्रयदाते' असणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, या सदनिकांमधील बोगस भाडेकरूंकडून वसुली करणारी आर्थिक साखळी कोण, याचीही चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली.
धर्मवीर नगर येथील तुळशीधाम परिसरातील बीएसयुपी योजनेतील घरे आणि वादाची मालिका थांबतच नसून येथील आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या सदनिकांचा काही रहिवाशांनी अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने बोटचेपी धोरण स्वीकारल्याने मनसे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली होती. अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश आले. या प्रकरणी ठाणे पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस धाडल्या.
सात दिवसात सदनिका मोकळी करून द्यावी. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच सामान जप्त केले जाईल, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. केवळ नोटिसा काढून आणि बोगस भाडेकरूंना हुसकावून लावणे, अशी थातुरमातुर कारवाई केल्यास मूळ 'वसुलीकिंग' मोकाट राहतील. पालिका प्रशासनाने त्यांचाही शोध घेणे आवश्यक असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांना घरी बसवावे, अशी मागणी मनसेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या भेटीदरम्यान केली. आठ वर्षांचा हिशोब द्या...
बीएसयुपीच्या या इमारतीमधील घरांचे टाळे तोडून आठ वर्षांपासून रहिवाशी बेकायदा पद्धतीने याठिकाणी वास्तव्याला आहेत. या आठ वर्षांच्या भाड्याच्या रकमेवर कोणी डल्ला मारला, असा सवाल मनसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आजतागायत या इमारतीची निबंधक सहकारी संस्थेकडे नोंदणी न केल्याने इमारतीची डागडुजीही रखडली आहे. भविष्यात इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.