स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, तीन दिवस चालणार व्याख्यानमाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:17 AM2018-01-11T10:17:01+5:302018-01-11T10:57:08+5:30
आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.
डोंबिवली- आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद पुरस्कार २०१८ व व्याख्यानमाला घेण्यात येते. त्याचा शुभारंभ बुधवारी सायं. 7 वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्या व्याख्यानाने झाली.
स्वामी विवेकानंदानी विजिगिषु भारतचे स्वप्न पाहिले यासाठी समाजाच्या ताकदीची पुर्नस्थापना करणे आवश्यक असून यासाठी समाजाचे संघटन, मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी हे लक्ष ठेवले. स्वातंत्र्यापूर्वी भारताची जगातील प्रतिमा ही अंधश्रद्धाळू व दुर्बल अशी होती. यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानानी ही प्रतिमा बदलण्यास मदत झाली असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.तीन दिवस चालणाऱ्या या व्यख्यानमालेचा समारोप ख्यातनाम अभ्यासक, लेखक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने होणार आहे. युवकांना ते मार्गदर्शन करतील, त्यानाच यंदाचा संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा "स्वामी विवेकानंद" पुरस्कार शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. पूर्वेकडील संस्थेच्या दत्तनगर शाळेच्या पटांगणावर हा उपक्रम सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह श्संजय कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा वैद्य यांनी तर आभार संस्था सदस्य रवींद्र जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल देवस्थळी हिच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.