स्वप्नील शेटे यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:32 AM2020-02-05T01:32:47+5:302020-02-05T01:33:19+5:30

ढाका येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान

Swapnil Shete Award for Best Photography | स्वप्नील शेटे यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार

स्वप्नील शेटे यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : बांगलादेश येथील ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात त्रिज्या या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, दिग्दर्शन आणि चित्रपट, असे पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण करणारे स्वप्नील शेटे हे कल्याणचे रहिवासी आहेत. शेटे यांच्या छायाचित्रणाची दखल घेऊन त्यांना या महोत्सवात सन्मानित केल्याने कल्याणकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कल्याणच्या लालचौकी परिसरात ते राहतात. ते छायाचित्रण क्षेत्रात १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘दूरदर्शन’वरही त्यांनी काम केले आहे. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. तसेच पदविकेपर्यंतचे शिक्षणही घेतले आहे.
छायाचित्रणात गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या स्वप्नील यांनी यापूर्वी ‘पठार’ व ‘भूक’ या गाजलेल्या लघुपटांचे तसेच ‘शोध तथागत बुद्धांच्या पदचिन्हांचा’ हा माहितीपट छायाचित्रित केला आहे. ‘नेमाडे’सारख्या गाजलेल्या धाटणीचा चित्रपटही त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वप्नील यांनी छायाचित्रण केलेल्या ‘त्रिज्या’ला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाने गौरविले गेले. ‘त्रिज्या’चे दिग्दर्शन अक्षय इंडीकर यांनी तर, निर्मिती बॉम्बे बर्लिन फिल्मने केली आहे. यापूर्वी शांघाय चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, दिग्दर्शन आणि चित्रपटाची तीन नामांकने मिळाली होती. इस्टोनियातील ‘ब्लॅक अ‍ॅण्ड नाइट्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही ‘त्रिज्या’ची निवड झाली होती.

स्वप्नील शेटे म्हणाले की, ‘मी पाहिलेला निसर्ग, वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट यातून माझे छायाचित्रणाचे कौशल्य सुधारत गेलो. त्यात माझ्या गुरू व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. छायाचित्रण हा अथांग सागर आहे. त्या सागरातील पाण्याचा स्पर्श आता कुठे माझ्या पायाला होत आहे. चित्रपट करताना एक विशिष्ट वातावरण व पोत गरजेचे असते.’

ते पुढे म्हणाले, ‘दिग्दर्शकाच्या संमतीने छायाचित्रण करणे मला खूपच आवडते. चित्रपटाच्या कथेला साजेशी लोकेशन, त्यातील प्रकाश व रंगयोजना यांचा उपयोग करून सिनेमा रचत जाणे हे खरोखरच आनंददायी असते. दिग्दर्शकाच्या कल्पनेतील विश्व तयार करायचे असते. चित्रपटाचे कलात्मक आणि व्यावसायिक वर्गीकरण करणे मला आवडत नाही. मी सगळ्या प्रकारचे चित्रपट पाहतो.’

पिंगबिंग, डॉयल आवडते छायाचित्रकार

मराठीतील अविनाश अरुण, संजय मेमाणे, बॉलिवूडमधील पंकज कुमार, हेमंत चतुर्वेदी, कैको नाकाहरा, हॉलिवूडमधील रॉजर डिकीन्स, इमॅन्युल ल्यूबेस्की तसेच जागतिक चित्रपट करणारे मार्क ली पिंगबिंग, ख्रिस्तोफर डॉयल हे छायाचित्रकार मला आवडतात, असे स्वप्नील शेटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

Web Title: Swapnil Shete Award for Best Photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.