ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:14+5:302021-08-17T04:46:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका महापौर निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर नगरसेवक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका महापौर निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर नगरसेवक पद रद्द होण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २४ ऑगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे याप्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका महापौर पदाची निवडणूक नोव्हेंबर २०१९ मध्ये पार पडली. भाजपातील ओमी कलानी समर्थक ९ नगरसेवकांनी व्हीपचे उल्लंघन करून पक्षाच्या उमेदवारीऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान केल्याने, त्या महापौरपदी निवडून आल्या. याविरोधात भाजपने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबरपूर्वी निर्णय घेण्याचा आदेश दिला. तसेच २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी ठेवल्याची माहिती जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. नगरसेवक या प्रक्रियेतून सहीसलामत बाहेर पडणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.
भाजपने प्रभाग व विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १२ नगरसेवकांवरही कारवाई करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली. यामध्ये भाजपातील ओमी कलानी टीम व जीवन इदनानी समर्थक अशा १२ नगरसेवकांचा समावेश आहे. महापौर निवडणुकीपूर्वी साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक अधिकृतपणे भाजपात सामील झाले होते. तशी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंद आहे. साई पक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत साई पक्षाच्या नगरसेवक आशा इदनानी यांनी दिले.
--------------