- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १४ नगरसेवकांविरोधात भाजपचे अध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. याप्रकारणी भाजपातील ओमी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार लटकली आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका जून महिन्यात झाल्या असून बहुमत असतांना पक्षातील बंडखोर नगरसेवकामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. असा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. भाजपचे मात्र ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवक पंचम कलानी, आशा बिराडे, रविंद्र बागुल, शुभांगी निकम, छाया चक्रवर्ती, डिंपल ठाकूर, दिपा पंजाबी, रेखा ठाकूर, सरोजनीं टेकचंदानी, हरेश जग्यासी, जीवन इदनानी, दीप्ती दुधानी, ज्योती चैनांनी व इंदीरा उदासी यांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून त्याविरोधात मतदान केले. पक्षात शिस्त राखण्यासाठी व व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी २५ जुलै रोजी पक्षाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली.
भाजपतील बंडखोर तसेच ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकात याप्रकारने एकच खळबळ उडाली. यापूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. या ९ नगरसेवका विरोधातही भाजपाने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र १८० दिवसात निर्णय न झाल्याने, भाजपने न्यायालयात दाद मागितली. यापूर्वी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली होती. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने रिपाइंच्या मदतीने सभापती पद राखले असून शिवसेना आघाडीत असलेले रिपाईचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपची ताकद वाढली आहे.
भाजपची याचिका अवैध - ओमी कलानी भाजपने व्हीपचे उल्लंघन केले म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन याचिका दाखल केली. ती पूर्णतः अवैध असून नागरसेवका विरोधात काहीएक कारवाई होणार नाही. असे मत ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी दिली. तसेच जीवन इदनानी यांनीही काहीएक होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.