कारवाईतील पक्षपातीपणामुळे प्रणाली घोंगेंची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:50+5:302021-02-27T04:53:50+5:30
ठाणे : नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची अचानक वर्तकनगर प्रभाग समितीत बदली केली आहे. त्यांच्या ...
ठाणे : नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची अचानक वर्तकनगर प्रभाग समितीत बदली केली आहे. त्यांच्या जागी आता बाळासाहेब चव्हाण यांना आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या चुकीच्या कारवायांमुळे त्या अडचणीत आल्या होत्या. त्यामुळेच त्यांची बदली केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
ठाणे महापालिकेत मागील काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. काही अधिकाऱ्यांचा अतिरिक्त चार्ज काढून घेऊन त्यांना मूळ पदावर आणले आहे. त्यात आता घोंगे यांचीही अचानक बदली केली आहे. काही दिवसांपासून त्यांच्याविरोधात तक्रारी वाढल्या होत्या. त्यांच्याकडून हेतुपुरस्सर कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी घोंगे यांच्यावर थेट आरोप केले होते. ज्या भागात कारवाई करणे गरजेचे होते, त्या ठिकाणी ती न करता नको तिथे कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. शांतीनगर ते कळवा खाडीकिनारी नव्याने झोपडपट्ट्या मागील काही दिवसांत वाढत होत्या. त्यांना महापालिकेकडून सेवाशुल्क लावण्यात येत होते. त्यामुळे झोपड्यांची संख्या वाढताना दिसत होती. त्यामुळे त्यातील काही झोपड्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. परंतु, ही कारवाई करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. एकीकडे नाल्यात बांधकामे होत असताना त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, दुसरीकडे मागील १५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरांवर ती करण्यात आल्याचा प्रकारही कोळी यांनी समोर आणला होता. या संदर्भात त्यांनी वारंवार पालिका आयुक्तांकडेदेखील तक्रार केली होती. तसेच इतरही तक्रारी आल्या होत्या. यातूनच आयुक्तांनी त्यांची बदली केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.