आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा मग सत्तेचे दावे करा; भाजपाचे शिवसेनेला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 07:24 PM2020-10-28T19:24:59+5:302020-10-28T20:31:17+5:30
Pratap sarnaik, Geeta jain: आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आला नाही . पालिकेत सत्ता आणण्याचे दावे करण्या आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा. राज्यात तुमची सत्ता आहे ना , मग कोणी भ्रष्टाचार केला याची लावा चौकशी असे थेट आव्हानच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी शिवसेनेला दिले आहे .
आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती . त्यावेळी आ. सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपाने मोठा भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप करत त्यांनी बीएसयुपी योजना कामाची निविदा , उद्याने आदी देखभालीसाठी ठेक्याने देण्याचे काम, परिवहन ठेक्यातील गैरप्रकार आदींची उदाहरणे त्यांनी दिली होती . तर आ. गीता जैन यांनी शहरात एका व्यक्तीचा विकास झाला असा आरोप करत भाजपाला शहरात चांगली लोकं नको आहेत असे सांगत टीकेची झोड उठवली होती .
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते . म्हात्रे यांनी आ . गीता जैन यांच्यावर टीकेची उडवली . गीता जैन ह्या भाजपच्या महापौर होत्या त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का ? त्या म्हणतात भाजपाच्या सत्ता काळात विकास झाला नाही मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लिटर पाणी योजनेचे उदघाटन झाले , सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला आदी विकास कामे झाली नाहीत का ? असे सवाल म्हात्रे यांनी केले .
राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हणून त्या पुन्हा भाजपा सोबत आल्या होत्या आणि प्रदेश नेतृत्वाशी संपर्कात होत्या . स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही . त्या भाजपा सोबत होत्या म्हणतात तर महापौर निवडणुकीत अक्षाच्या विरोधात मतदान कसे केले ? त्यांच्या सोबत एकही नगरसेवक शिवसेनेत गेला नसून अश्विन कसोदरिया , विजय राय यांनी सभापती निवडणुकीत भाजपलाच मतदान केले आहे . तर अन्य कार्यकर्ते देखील मला भेटून बोलले कि आम्ही भाजपा सोबतच आहोत .
शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे गेली १५ वर्षे आमदार आहेत . गेल्या १५ वर्षांचा त्यांचा रेकॉर्ड पाहता ते नुसते बोलतात . कोणी भ्रष्टाचार केला ? किती रकमेचा झाला ? कोणत्या खात्यात झाला ? . त्यांनी एकही भ्रष्टाचार सिद्ध केलेला नाही . उंटावरून शेळ्या हाकत फालतूचे आरोप करायची सरनाईकांची सवय आहे . आता राज्यात तुमची सत्ता आहे . मग चौकशी लावा . जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना सजा व्हावी असे आमचेपण म्हणणे आहे असे म्हात्रे म्हणाले .
सरनाईक गेली १५ वर्ष आमदार असून देखील त्यांना पालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्याचे सोडाच सत्तेच्या जवळ देखील पोहचता आले नाही . आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा . आत्ताच्या सभापती निवडणुकीला देखील सेनेच्या नगरसेविका दीप्ती भट गैरहजर होत्या . सेनेचे अनेक आजीमाजी नगरसेवक , पदाधिकारी भाजपात आले आहेत . आणखी देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. सरनाईक हे शिवसेनेची सत्ता आणण्याचे पोकळ दावे गेल्या १५ वर्षां पासून करत आले आहेत असा टोला म्हात्रे यांनी लगावला .
माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकारण सोडल्याचे जाहीर केले आहे. त्यांना समाजसेवा करायची असल्याने ते महापालिकेत येतात व महापौर, आयुक्तांना भेटत असतात असे भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले.