ठाणे- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री मुंबईतून अटक केली. 20 वर्षांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या एका खून प्रकरणामध्ये तो फरार होता. साधारणत: 20 वर्षांपूर्वी केबल व्यवसाय तेजीत होता. या व्यावसायिक स्पर्धेतून 31 आॅगस्ट 1998 रोजी मुंब्रा येथील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद उमर बांगडीवाला यांचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. एक गोळी रोशन आरा नावाच्या 13 वर्षाच्या मुलीला चुकून लागल्याने तीदेखील जखमी झाली होती.मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी तारिक परवीनसह सात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तारिक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकादेखील केली होती. तारीक परवीन 1998मध्ये दुहेरी हत्याकांडात आरोपी आहे. यापूर्वीही जानेवारी 2015मध्ये डी कंपनीचे सक्रिय सदस्य असलेल्या तारीक परवीन आणि मोहम्मद उस्मान यांना पकडण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर त्यांची सुटका झाली होती. मुंबईहून तारीक परवीन आणि लखनऊहून मोहम्मद उस्मान यांना अटक लखनऊ पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यानंतर त्यांची सुटका झाल्यानं लखनऊ पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेला जवळपास 20 वर्षे उलटल्यानंतर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास तारिकला मुंबईतील एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमधून अटक केली.गेल्या काही वर्षांपासून तो रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये त्याने कार्यालय थाटले होते. खंडणी विरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये ठाणे न्यायालयाने त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, विकास बाबर, विलास कुटे, संदेश गावंड, प्रशांत भुरके यांनी ही कामगिरी केली.
मुंब्य्रातील खून प्रकरणात छोटा शकीलचा हस्तक तारीक परवीनला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 10:45 AM