ठाणे : शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची झाडाझडती घेतली. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच दुपारी १२ ते ४ वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीचे निर्देश देत वाहतूक कोंडीसह खड्डे मुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स तैनात करण्याचे आदेशही त्यांनी वाहतूक विभागास दिले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक विभागासह पोलीस आणि संबंधीत यंत्रणेची तातडीची बैठक शिंदे, यांनी शनिवारी घेऊन आदेश जारी केले. जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी नियमित वेळापत्रक तयार करण्यासह दरम्यान त्यांना नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी यांनी दिले.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याची गंभीर दखल घेत शुक्रवारीही त्यांनी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाची पाहणी केली. कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या वाहतूक समस्येविरोधात शनिवारी पुन्हा सर्व अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेऊन त्यांनी वाहतुकीला शिस्त लावून समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना आज सुचवल्या आहेत. या बैठकीला ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ठाणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे, यांनी दिले.