टीडीआर घोटाळ्यावरून सेना-भाजपात जुंपली

By admin | Published: October 10, 2015 12:05 AM2015-10-10T00:05:08+5:302015-10-10T00:05:08+5:30

टीडीआर घोटाळा हा सर्व पक्षांनी संघटित होऊन केलेला बदलापुरातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. यात अडकलेले शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी

TDR scam ties up with army and BJP | टीडीआर घोटाळ्यावरून सेना-भाजपात जुंपली

टीडीआर घोटाळ्यावरून सेना-भाजपात जुंपली

Next

ठाणे : टीडीआर घोटाळा हा सर्व पक्षांनी संघटित होऊन केलेला बदलापुरातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. यात अडकलेले शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त झाले आहेत. भ्रष्टाचार करताना सोबत असलेले राजकारणी आता या प्रकरणातून वाचण्यासाठी मित्राचाच बळी देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बदलापुरातील राजकीय वातावरण पूर्णत: दूषित झाले आहे.
टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) हा घोटाळा प्राथमिक पातळीवर २० कोटींचा वाटत असला तरी तपासात या घोटाळ्याचा आकडा २०० कोटींपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणारे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची इत्थंभूत माहिती संकलित केली आहे. घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार कोणत्या बँकेतून आणि कोणाच्या बँक खात्यातून कोणाकडे वर्ग झाले, याचीदेखील सखोल माहिती काढली आहे. तसेच या प्रकरणात आलिशान गाड्या भेट देणाऱ्यांचे आर्थिक व्यवहारदेखील तपासण्यात आले आहेत. घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींच्या परदेश दौऱ्यांचीही माहिती काढली आहे. उच्च न्यायालयात घोटाळ्यांशी संबंधित भक्कम पुरावे सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.
तपासाचा फास घोटाळेबहाद्दरांवर आवळला जात असताना त्यातून बचावासाठी अनेकांनी आपल्याच सहकाऱ्याचा बळी देण्याची तयारी ठेवली आहे. घोटाळे करताना एकी करणाऱ्या राजकारण्यांमध्ये आता मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुषार बेंबाळकर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर शिवसेनेनेदेखील भाजपावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनाविरुद्ध भाजपा अशी आरोपांची लढत सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

माहितीच्या आधारावरुन इतरांवरही गुन्हे दाखल करणार
या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, सहायक नगररचनाकर सुनील दुसाने, नगर अभियंते अशोक पेडणेकर, तुकाराम मांडेकर, किरण गवळे आणि निलेश देशमुख यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुषार बेंबाळकर यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना न्यायालयाने अटक न करण्याचे आणि तपासासाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आरोपींकडून माहिती घेण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर इतर आरोपींच्या विरोधातही गुन्हे दाखल होणार आहे.

Web Title: TDR scam ties up with army and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.