अंबरनाथमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर शिक्षकाचा अत्याचार; पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 05:51 AM2024-12-08T05:51:17+5:302024-12-08T05:51:26+5:30
अत्याचाराचा व्हिडीओ काढून केली दमदाटी. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघड झाली. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. शेजारील बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील शिपायाने काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघड होऊन प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. ही घटना अद्याप ताजी असताना अंबरनाथमध्ये तीन मुले शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचाराची शिकार झाली.
अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक लैंगिक चाळे करत होता. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला. पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. ज्या परिसरात ही शाळा आहे त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘त्यांना’ जामीन मंजूर
बदलापूरमधील शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने काही महिन्यांपूर्वी दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेत घुसून तोडफोड केली. त्यानंतर हजारोंचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात घुसून रेल्वेमार्गात बसला. तब्बल अकरा तास रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मुंब्रा येथे एन्काउंटर झाला. दीर्घकाळ फरार असलेले शाळेचे विश्वस्त व मुख्याध्यापिका हे त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आले व त्यांना तातडीने जामीन प्राप्त झाला.