ठाणे: ठाण्यात एकाच दिवशी एकाच वेळी अडीच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमले. निमित्त होते ते भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सामहिक संपूर्ण वंदे मातरम’ गायनाच्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ठाणे शहरातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. गुरूवारी सकाळी मॉडेला कंपाऊंड, मुलुंड चेकनाक्याच्या जवळ, ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री रामचंद्र रामुका, मुनी निलेशचंद्र महाराज, भगिनी निवेदिता मंडळाच्या रोहिणी बापट, सुनंदा अमरावतकर, माधव पुजारी, विक्रम भोईर, राजेंद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर रोहीणी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘संगठन गढे चलो, सुपंथपर बढे चलो’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर जीवनव्रती कार्यकर्ती सुजाता दळवी यांनी ‘भगिनी निवेदिता’ या विषयावर तर अ. भा. विद्यार्थी परिषद, कोकणप्रांत मंत्री प्रमोद कराड यांनी ‘वंदे मातरम’ या विषयावर आपले विचार मांडले. कराड म्हणाले की, वंदे मातरमचा अर्थ समजून घेतला तर ‘वंदे मातरम म्हणा’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर रामुका यांनी अध्यक्षीय भाषण केले. शेवटी अडीच हजार विद्यार्थ्यांनी आपल्या आवाजात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अश्विनी बापट, प्रज्ञा पोळ यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन अमरावतकर यांनी केले. कार्यक्रमात सरस्वती सेकंडरी स्कूल, महाराष्ट्र विद्यालय, मो.ह. विद्यालय, ब्राह्ण विद्यालय, शिवसमर्थ विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रसारणी विद्यालय, मनिषा विद्यालय, आर.जे. ठाकूर, श्रीराम विद्यालय, अनमोल, नानिक, पीपल्स एज्युकेशन, नाखवा, आनंद विश्वर गुरुकुल शाळा व महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय अशा एकूण जवळपास २१ शाळा व महाविद्यालयांचा यात समावेश होता. महिनाभर आधीपासूनच विद्यार्थ्यांचा सराव त्यांच्या शाळांमध्येच सुरू होता. एका सूरात, एका तालात वंदे मातरम म्हणता यावे यासाठी प्रत्येक शाळांत सीडी आणि वंदे मातरम लिखीत पत्र तयार करुन मंडळाने दिले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिली.
ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 4:06 PM
अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सूर निनादले. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाण्यात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले.
ठळक मुद्देएकाच वेळी अडीच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमले ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायनाचा कार्यक्रम२१ शाळा व महाविद्यालयांचा समावेश