ठाणे : कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या बेतात असलेल्या उत्तर प्रदेशातील एका १९ वर्षीय तरुणीला महापालिकेच्या एका सुरक्षारक्षकाने तिला त्यापासून परावृत्त केले. या तरुणीची रवानगी पोलिसांनी सुधारगृहात केली आहे.ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहा. आयुक्त शंकरराव पाटोळे हे सोमवारी दुपारी कार्यालयात जात असताना कळवा खाडीजवळ एक मुलगी आत्महत्या करण्याच्या बेतात असल्याचे त्यांना दिसले. या मुलीने तिच्याजवळील सामान खाडीत टाकून दिले व त्यानंतर ती स्वत: पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत होती. पाटोळे यांनी लागलीच त्यांचे सुरक्षारक्षक ग्यानदेव निखारे यांना तिला वाचवण्याचे आदेश दिले. निखारे यांनी धावत जाऊन त्या तरुणीला मागे ओढले. या तरुणीची चौकशी केली असता, तिचे नाव नंदिनी शिवचरण गुप्ता असून ती उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रामनगर येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुंबईला आली होती. २ ते ३ हजार घेऊन घरातून पलायन केलेली नंदिनी दोन दिवसांपासून उपाशी होती. विवियाना मॉलजवळून रिक्षाने ती कळवा खाडीपर्यंत आली व तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. तिला दोन लहान बहिणी असून वडिलांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले. मुलीची रवानगी सुधारगृहात केल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी सांगितले.
ठामपा सुरक्षारक्षकाने वाचवले तरुणीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:31 AM