ठाकुर्ली उड्डाणपूल, खंबाळपाडा राेडवर आधीच खड्डे; त्यात अंधारी वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:07+5:302021-08-17T04:46:07+5:30

डोंबिवली : शहरातील बहुतांश रस्त्यांची पावसात खड्ड्यांनी चाळण झाली असताना दुसरीकडे पथदिवेही नादुरुस्त होऊन बंद राहत असल्याने अंधारातून खड्डे ...

Thakurli flyover, already potholes on Khambalpada road; Dark wait in it! | ठाकुर्ली उड्डाणपूल, खंबाळपाडा राेडवर आधीच खड्डे; त्यात अंधारी वाट!

ठाकुर्ली उड्डाणपूल, खंबाळपाडा राेडवर आधीच खड्डे; त्यात अंधारी वाट!

Next

डोंबिवली : शहरातील बहुतांश रस्त्यांची पावसात खड्ड्यांनी चाळण झाली असताना दुसरीकडे पथदिवेही नादुरुस्त होऊन बंद राहत असल्याने अंधारातून खड्डे वाचविताना वाहनचालकांची अक्षरश: कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाकुर्ली उड्डाणपूल आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवरून जाणाऱ्या वाहनचालकांना याची प्रचिती वारंवार येत आहे. मोठी दुर्घटना घडल्यावरच सरकारी यंत्रणांना जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.

मुख्य रस्ते असोत की चौक, सर्वत्रच खड्डे आहेत. डांबरी रस्ते खड्ड्यांत गेले असताना सिमेंट काँक्रिटचे रस्तेही सुस्थितीत नाहीत. केडीएमसी, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ या सर्वांच्याच अखत्यारीतील रस्त्यांची सध्या बिकट अवस्था आहे. खडीकरणाने खड्डे भरले जात आहेत. ही तात्पुरती डागडुजी निरर्थक ठरत आहे. पावसाच्या पाण्यात ही खडी खड्ड्याबाहेर येऊन ती अधिक त्रासदायक ठरत आहे. ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. आधीच खड्ड्यांचा त्रास सोसावा लागत असताना त्यात पथदिवे बंद असल्याने अंधारातून वाट काढावी लागत आहे. कोपर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावरून डोंबिवली शहरातील पूर्व-पश्चिम वाहतूक सुरू आहे.

अपघातांची धास्ती

रेल्वेच्या हद्दीत उतरणाऱ्या या पुलावर खड्डे पडले आहेत. तसेच, मनपाच्या हद्दीतही पूर्वेतील बाजूला उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाही खड्डे आहेत. या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती पूर्वेतील खंबाळपाडा मार्गावर आहे. खंबाळपाडा रस्ता हा कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या मध्यभागी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. बहुतांश रस्ता हा डांबराचा आहे. या ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने हा रस्ता अंधारात असतो. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी ललित संघवी या तरुण व्यापाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. आताचे येथील वास्तव पाहता आणखी एकाचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहते आहे का? तातडीने पथदिवे लावून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.

---------------------------------------------------

Web Title: Thakurli flyover, already potholes on Khambalpada road; Dark wait in it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.