ठाणे : ठाणे महापालिकेने दिवा परिसरात स्मार्ट सिटीतून एकही काम न घेतल्याबद्दल आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून १४८ कोटी रुपयांच्या सीसीटीव्हींच्या दर्जाहीन कामाबद्दल बुधवारी दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संताप व्यक्त करून प्रशासनाची झाडाझडती घेतली.
स्मार्ट सिटी योजनेतून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आतापर्यंत ७५३ ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. परंतु, त्यांचा जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्न पाटील यांनी केला. त्यावेळी पूर नियंत्रण व गुन्हेगारी नियंत्रणासाठी फायदा झाल्याचा दावा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केला. मात्र, त्याची ठोस आकडेवारी अधिकारी देऊ शकले नाहीत. २७ गावांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवले नसल्याचे बैठकीत उघड झाले. त्यावेळी केंद्र सरकारने जनतेचाच पैसा स्मार्ट सिटी योजनेसाठी उपलब्ध केला. गावे वगळली म्हणून सीसीटीव्हींचे काम थांबवू नये, असे पाटील म्हणाले. त्यावेळी पुन्हा सर्वेक्षण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी डीपीआरनुसार महिनाभरात सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली.
त्याचबरोबर ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून दिवा परिसरात कोणतीही कामे न केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून सापत्न वागणुकीबद्दल प्रशासनाला खडेबोल सुनावले.
केंद्र सरकारच्या योजनांमधून दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तालुका स्तरावर शिबिरे भरवावीत, मुंबई-ठाण्यातील जनतेची भाजीपाला-फळांची गरज ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमार्फत भागविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून समिती बनवावी, कोईम्बतूर भात बियाण्यांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनाच्या किमतीएवढी भरपाई देण्याचा प्रयत्न करावा, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झालेल्या गावात तत्काळ ट्रान्सफॉर्मर पोहोचवावा, शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करू नये, आदी सूचनाही पाटील यांनी सरकारी यंत्रणांना केल्या.