ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोची कारशेड गोवे येथेच; नगरविकासचे शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:59 PM2019-09-08T23:59:31+5:302019-09-08T23:59:45+5:30
ओवळ्याचे आरक्षण नामंजूर करण्याचे प्रताप
नारायण जाधव
ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ अंतर्गत विस्तारित ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गावरील नियोजित कारशेड आता भिवंडी तालुक्यातील गोवे येथेच उभारण्यावर एमएमआरडीएच्या विनंतीवरून नगरविकास विभागाने स्थानिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून २९ आॅगस्ट २०१९ रोजी शिक्कामोर्तब केले आहे.
यापूर्वी तिला ठाण्यातील ओवळा-कासारवडवली, कल्याण कृषी बाजार समितीसह कोन येथील काही घटकांनी विरोध केला होता. त्यानंतर, जानेवारी २०१८ मध्ये ती भिवंडी तालुक्यातील गोवे येथे उभारण्याचे निश्चित करून तसा प्रस्ताव एमएमआरडीएने नगरविकास विभागाकडे पाठविला होता.
ओवळा येथील आरक्षण नामंजूर
याशिवाय, नगरविकास विभागाने ठाणे शहरातील ओवळा येथील यापूर्वीच्या मेट्रो कारशेडसह संलग्न सुविधा आणि वाणिज्यवापरासाठी बदल करण्यास दिलेली मान्यता रद्द करून ठाणेकरांना दिलासा दिला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील ४० मीटर रुंदीच्या रस्त्यासह हरित क्षेत्र आणि रहिवास क्षेत्र बाधित होत असून नव्याने २५ मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम आणि ही अंदाजे १५ हेक्टर जमीन खासगी असल्याने तिच्या भूसंपादनाचा खर्च न परवडणारा असल्याचे कारण दिले आहे. मात्र, यापूर्वी ती आरक्षित करताना एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाने याचा विचार केला नव्हता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत असून यामागे काही बिल्डर आणि राजकारण्यांचे हित जपण्याचा नगरविकास आणि एमएमआरडीएचा प्रताप असल्याची टीका आता हे मंजूर केलेले आरक्षण नामंजूर करण्यामागे मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर होऊ लागली आहे.
दरम्यान, ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालासही राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मेसर्स डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी तो तयार केला असून या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला आहे.
ठाणे ते कल्याणदरम्यान या मार्गावर १७ स्थानके प्रस्तावित असून अहवालात कोन येथे मेट्रोची कारशेड प्रस्तावित केली होती. तत्पूर्वी ती कल्याण-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर करण्यात येणार होते. मात्र, या जागेवर कारशेड उभारल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्वच धोक्यात येऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार असल्याने तिला तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर, ती भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन येथे उभारण्याचे ठरले. त्यासाठी १५ हेक्टर जागा लागेल, असे निश्चितही करण्यात आले. मात्र, त्यास विरोध होऊ लागल्यानंतर आता ती थेट एमएमआरडीएने अधिसूचित केलेल्या भिवंडी तालुक्यातील ६० गावांपैकी गोवे येथे करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या जागेवर आता मेट्रो-रेल कार डेपो, संलग्न सुविधा आणि वाणिज्य वापरासह मॉल आणि तत्सम सुविधा उभारून एमएमआरडीए आपला खर्च वसूल करणार आहे.