जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रेमण्ड कंपनी येथे चालु असलेल्या साईटवर खोदकाम करण्याकरीता मिळालेल्या परमिशनपेक्षा जास्तीचे खोदकाम करीत असल्याचा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास सादर न करण्यासाठी दहा लाखांची मागणी करुन सहा लाखांच्या तडजाेडीतील दोन लाखांची लाच स्वीकारतांना ठाणे तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी महेंद्र गजानन पाटील (५९) आणि खासगी व्यक्ती वाजीद महेबुब मलक (६३) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी ठाणे तहसीलदार कार्यालयात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रारदारांकडे मंडळी अधिकारी पाटील यांनी खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास सादर न करण्याकरीता दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे एसीबी कार्यालयात धाव घेत, याबाबत तक्रार दाखल केली. याचदरम्यान पाटील यांनी तक्रारदारांकडे तडजोडीअंती सहा लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यापैकी दोन लाखांचा पहिला हप्ता २० डिसेंबर रोजी तर दुसरा चार लाखांचा हप्ता २३ डिसेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केले होते.
यातील पहिला दोन लाखांचा हाप्ता स्वीकारताना पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. पाटील यांनी लाचेची ही रक्कम स्वीकारुन ती वाजीद यांच्याकडे ठेवण्यास दिली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे एसीबीने म्हटले आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन थोरात हे करीत आहेत.