गायमुख ते पायेगाव प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार! खाडीपुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:25 PM2024-03-27T15:25:21+5:302024-03-27T15:26:52+5:30
गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे.
ठाणे : ठाण्यातील गायमुख ते भिवंडी येथील पायेगाव हा प्रवास एक तासावरून अवघ्या पाच मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत.
चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील पायेगाव आणि ठाण्यातील गायमुख हे दोन भाग वसई खाडीच्या दोन बाजूंना आहेत. मात्र, या दोन भागांना जोडण्यासाठी खाडीपूल नाही. त्यातून सद्य:स्थितीत गायमुख येथून पायेगावला जाण्यासाठी ३० किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. त्यातून या प्रवासाला सुमारे एक तासाचा वेळ लागतो. परिणामी, प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे या भागात खाडीपूल उभारण्याची गरज निर्माण झाली होती.
‘एमएमआरडीए’च्या ऑक्टोबर २०२२ मध्ये पार पडलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने आता या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.
तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती -
पायेगाव आणि गायमुखदरम्यान ६.४२ किमी लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यामध्ये ४.४७ किमी लांबीचा खाडीपूल असेल. हा रस्ता प्रत्येकी दोन लेनचा असणार आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर गायमुख ते पायेगाव या प्रवासासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी लागेल. त्यातून प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच गायमुखपासून चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील भाग अधिक जवळ येण्यास मदत मिळणार आहे.
या खाडीपुलाच्या कामासाठी ९२९.१२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती होऊन प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.