ठाणे - एकीकडे ठाण्याचा महापौर कोण होणार यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु दुसरीकडे महापौर कोणी झाला तरी त्याची निवड ही बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापौर निवडणुकीत पहिल्यांदा महाशिवआघाडीचे दर्शन घडणार आहे. यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. शिवसेनेच्या श्रेष्ठींकडून नरेश म्हस्के यांना शब्द देण्यात आला असला तरी महाशिवआघाडीच्या निमित्ताने अनेक नावे चर्चेत आली आहेत.राज्यातील बहुतेक महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. यामध्ये ठाण्याची खुला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने आता पुढील सव्वा दोन वर्षे या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार पक्षाची पसंती ही सभागृह नेते नरेश म्हस्के यांना असली तरी, आता महापौर खुला प्रवर्गासाठी सोडत असल्याने अनेकांनी यासाठी दावा ठोकण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवराम भोईर यांचे नाव पुढे असून सध्याच्या विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कळव्यातील अनिता गौरी यांच्या नावाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र नरेश म्हस्के यांना पक्षाने महापौराबद्दल शब्द दिल्याचा दावा करण्यात आला असल्याने खासदार आणि आमदारांच्या पत्नींनी यातून माघार घेतल्याचे बालले जात आहे.यापूर्वी महापौर निवडणुकीत अनेक वेळा चुरस झाल्याचे पहावयास मिळाले होते. 2012 च्या महापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेच्या जवळ येऊनही शिवसेनेला महापौरपदासाठी ठाणे बंदची हाक द्यावी लागली होती. त्यावेळेस मित्र पक्ष असलेला भाजपचा एक नगरसेवक गायब झाला होता. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळेस मनसेने टाळी दिल्याने शिवसेनेला महापौरपद मिळाले होते. त्यानंतरही अडीच वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेसही सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागली होती. परंतु ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आता वेगळे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढली असल्याने त्याचे दर्शन आता ठाणे महापालिकेतही झाले आहे. नुकत्याच झालेल्या महासभेतसुद्धा या महाशिवआघाडीचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता महापौर निवडणुकीतही हाच पॅटर्न दिसून येणार आहे.काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. महाशिवआघाडी असल्याने या निवडणुकीतून राष्ट्रवादीने जवळ जवळ माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता अनेकांनी महापौरपदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:49 PM