ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 03:19 PM2017-12-14T15:19:04+5:302017-12-14T15:24:43+5:30
मो. कृ नाखवा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी - शिक्षकांचा अनोखा संगम येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.
ठाणे: मोतिराम कृष्णाजी नाखवा हायस्कूल, ठाणे माध्यमिक या शाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद मेळावा रंगणार आहे. निमित्त आहे ते शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या शिर्षकाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मो. कृ. नाखवा हायस्कूल या विद्यालयाच्या स्थापनेस ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रविवार १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ७ यावेळेत नाखवा हायस्कूलच्या सभागृहात माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांच्या आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी, मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी व शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. १९६७ पासून ‘मागेल त्याला शिक्षण’ या ब्रीद वाक्याला अनुसरून कोपरी कॉलनी, कोपरी गाव, चेंदणी कोळीवाडा, आनंदनगर, पारशीवाडी, धोबीघाट, सिद्धार्थनगर, शांतीनगर, विजयनगर, कळवा, खारीगांव, दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पार्क साईट या ठिकाणाहून येणाºया विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्याचे काम अविरतपणे नाखवा विद्यालयाने केले आहे. मागील वर्षात शाळेने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी दिले आहेत. असे विद्यार्थी घडविणारे शिक्षकही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात शाळेचे एकच ध्येय आहे की, आतापर्यंत बाहेर पडलेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना हाक देणे, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’. पुन्हा एकदा आपले जुने सवंगडी, शिक्षक यांना भेटणे. एकमेकांचे कुशलक्षेम विचारणे. आपण समाजातील काही देणे लागतो. आपण शिकलो पण येणाºया पिढीसाठी काही करता येईल का? म्हणून या रविवारचा आनंदमेळा आयोजित केला असल्याचे विद्यालयातर्फे सांगण्यात आले.