ठाणे मोक्का न्यायालयाने केली १४ जणांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:34 AM2020-03-20T02:34:43+5:302020-03-20T02:35:03+5:30
सर्व जण रिक्षाचालक, टॅक्सीचालक, जकात एजंट असून, त्यांच्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.
ठाणे : येथील कोपरी, पारशीवाडी परिसरातील एकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या १५ जणांपैकी १४ जणांची गुरुवारी ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.बहलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. हे सर्व जण रिक्षाचालक, टॅक्सीचालक, जकात एजंट असून, त्यांच्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.
या खटल्यात सरकारी वकील यांनी केलेल्या युक्तिवादात १३ जुलै २०१२ रोजी पारशीवाडी कोपरी येथील दुकानात राजेश घाटगे हे मोबाइलवर चॅटिंग करीत असताना त्यांच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले. तसेच चॉपरने जीवघेणा हल्लाही केला. या घटनेत जखमी घाटगेना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा संघटित हल्ला केल्याचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाच्या वतीने पुनित माहिमकर, पंकज कवळे, अनिरु द्ध परदेशी, रीना कोरडे, सुदीप पासबोला आणि गौरेश कदम यांनी युक्तिवाद करून सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला आव्हान दिले. बचाव पक्षाच्या वकिलांनी काही साक्षी आणि पुरावेही सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बहलकर यांनी आरोपींना दोषमुक्त केले.
हे आरोपी ठरले निर्दोष, एकाचा मृत्यू
विजय उर्फ कांचा मोरे (२९, रिक्षाचालक), मोहसीन पटेल (३४), सागर राजभर (२९), रमेश उर्फ रम्या साळवे (४३), श्रीपाद उर्फ नीलेश पराडकर (४५, केबल आॅपरेटर), नवनाथ गुरव (४४), प्रशांत उर्फ पाशा देशमुख (४९), श्याम तांबे (३९), बाला मुदलीयार (४४, जकात एजंट)
मनीष उर्फ पिंट्या साळवे (३७), विजय राजू महाडिक (३८), राजू भालेराव (३४), रोहित गायकवाड (४१ एजंट) आणि मंदार भोसले (४८,जकात एजंट) या आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. राहुल उर्फ पप्पू साळवे (२१, चालक) याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.