ठाणे महापालिकेचे आयुक्त अहंकारी - अबु आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:13 PM2018-06-30T16:13:13+5:302018-06-30T16:23:01+5:30
ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते.
ठाणे - एखादा आमदार ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन देतो, त्यावेळेस त्यांनी त्याचा सन्मान करीत उभे राहून ते स्विकारणे अपेक्षित असते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तसे काहीच केले नाही, ते एक अहंकारी आयुक्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला. या प्रकारचा येत्या अधिवेशनात जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंब्य्रातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आझमी हे ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी आलेल्या अनुभवानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट आयुक्तांवर निषाना साधला. कोणताही आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्या आमदाराचा सन्मान करणे गरजेचे आहे, आलेल्या आमदाराला दारापर्यंत सोडले पाहिजे, परंतु आयुक्तांनी साधे म्हणने देखील व्यवस्थित ऐकूण घेतले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंब्य्रातील ऊर्द शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसून त्यांना दरवाजे देखील नाही, इमारतींची अवस्था दयनीय आहे. ही माहिती त्यांना दिली असता मी काय करु असे उलट उत्तर आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक आयुक्तांनी या समस्या सोडविणे अपेक्षित असतांना अशा अहंकारी पध्दतीने उत्तरे देणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे मुंब्य्रातील कब्रस्थानाची जागा प्रशासनाने बदलली आहे. आता जी जागा प्रस्तावित केली आहे, ती जागा येथील रहिवाशांनी खुप लांब पडणार आहे. परंतु आयुक्तांच्या म्हणन्यानुसार आधीची जागा ही सीरआरझेडची असल्यानेच कब्रस्तानची जागा हलविण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विधानात तथ्य वाटत नसल्याने याबाबत माहिती अधिकार टाकला जाणार असून, त्यात माहिती चुकीची आढळल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मुंब्य्रात फेरीवाल्यांची समस्या देखील गंभीर स्वरुप धारण करीत असून फुटपाथवरुन चालणे शक्य होत नाही, त्यामुळे फेरीवाला झोन तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार कमी पडत असल्यानेच आता आम्हाला या समस्या सोडवाव्यात लागत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा नामोउल्लेख टाळत आरोप केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे मल्टीप्लेक्सचा मुद्दा घेऊन ते आता भांडत आहेत. मनसे केवळ गुंडगीरी आणि मारामारी करणारा पक्ष असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शिवसेना आणि भाजपा जरी वेगळ्या विर्दभासाठी आग्रही असली तरी देखील आम्ही त्यांनी साथ देणार नसल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले.