ठाणे - मागील वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीने गिरवून पहिल्याच बैठकीत नव्या समितीने तब्बल ५ हजार २१३ वृक्ष तोडण्याला परवानगी दिली होती. परंतु आता पालिकेच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील दक्ष नागरीकाने याविरुध्द थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने संबधींत अधिकाऱ्याना याबाबत नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे आता वृक्ष तोड परवानगींचे प्रकरण पालिकेच्या चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मागील काही महिने वादादीत ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. या समितीची पहिलीच बैठक आॅक्टोबर महिन्यात पार पडली. या बैठकीच्या विषय पटलावर महापालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये बाधीत होत असलेले ४२५ वृक्ष तर बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावांमध्ये बाधीत होत असलेले एक हजार ९० वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यासह इतर असे तब्बल ५ हजार २१३ वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले.त्यानंतर या वृक्ष तोडीला दिलेल्या परवानगीच्या मुद्यावर वृत्त देखील प्रसिध्द झाले होते. तसेच ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या पदाधिकाºयांनी देखील या वृक्ष तोडीच्या प्रकरणांसदर्भात दाद मागितली होती. परंतु पालिका प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने अभियानाच्या सदस्य रोहीत जोशी यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता न्यायालयाने देखील पालिकेला याबाबत नोटीस बजावली असून त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी मुदत दिली आहे. आता या संदर्भातील पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. एकूणच वृक्ष तोडीच्या परवानगीचे प्रकरण आता पालिकेच्या चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.