ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ प्रदर्शनाला सुरवात, ५०० जातींचे वृक्ष पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:31 PM2018-01-13T16:31:01+5:302018-01-13T16:38:35+5:30
ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. येत्या १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून, यामध्ये ४० स्टॉल आहेत. तर ५०० जातीचे वृक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
ठाणे - केवळ इंटरनेटवर अथवा सोशल मीडियावर फुलांचे, झाडांचे किंवा पर्यावरणाचे फोटो पाहून सध्याचे युवक समाधान मानत आहेत. परंतु खरी फुले, वेगवेगळी झाडे पाहण्याची संधी त्यांना मिळाली आहे ठाण्यात वृक्षवल्ली नावाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने. ठाणे महापालिकेच्या या प्रदर्शनात ५०० हुन अधिक वेगवेगळ्या जातीची फुले व झाडे, वेली असून ती पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.
जास्तीत जास्त ठाणे हिरवे व्हावे, ठाण्यात झाडांची संख्या वाढावी व ठाण्यातील प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने हे प्रदर्शन महापालिकेमार्फत भरविले जाते. त्यानुसार यंदाचेही हे १० वे वर्ष आहे. वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यसह जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या वतीने भरविण्यात आलेले हे प्रदर्शन ठाणेकर नागरिकांसाठी १४ जानेवारी पर्यंत खुले राहणार आहे. झाडांचे जतन व्हावे तसेच नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी या करिता या प्रदर्शनचे आयोजन रेमंड कंपनीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शोभिवंत पानफुलांच्या कुंड्यांबरोबर, वामन वृक्ष, कॅक्टस, आॅर्किड गुलाब पुष्प, पुष्प रचना, गुलाब, झेंडू, अनेक रानटी फुले, औषधी वनस्पती, कमळ, वेगवेगळ्या रंगाचा मोगरा, जाई जुई, जास्वंद, आर्चिड, रान मोगरा, गावठी झेंडू अशा अनेक प्रकारची फुले येथे उपलब्ध आहेत, फळ झाडांची मांडणी, भाजीपाला उद्यानाची प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित छायाचित्र, रंगचित्रणाचा देखील या मध्ये समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आवडती शोभिवंत झाडे, फुलांची रोप, कुंड्या, हंगामी फुलांची रोप, औषधाची वनस्पतीची माहिती मिळणार आहे. किबंहुना या सर्व पर्यावरणाची माहिती या समाजातील सर्वच वर्गाला या माध्यमातून मिळणार आहे. ठाण्यात झाडांची संख्या वाढून ठाण्यातील प्रदुर्षण कमी होणार आहे. हाच प्रदर्शनच मुख्य उद्देश आहे आणि दुसरा उद्देश म्हणजे तरु ण वर्गाला या पर्यावरणाची ओळख पटवून देणे यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नर्सरी,औषध आणि कुंड्या आदींचे ४० स्टॉल धारक यांचा समावेश असून या प्रदर्शनात ५०० हुन अधिक झाडे पाहण्याची संधी मिळाली आहे.