ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी एक कोटी घेतल्यानेच हॉटेल व्यवसायिकांना १५ दिवसांची मुदतवाढ, मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:41 PM2018-01-09T17:41:38+5:302018-01-09T17:43:17+5:30
शहरातील हॉटेल व्यवसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ पालिकेतील काही अधिकाऱ्यांना एक कोटी मिळाल्यानेच हॉटेलवाल्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
ठाणे : मुंबईत घडलेल्या आगीच्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने फायर एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४५८ हॉटेल, पबला नोटिसा बजावल्या होत्या. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सर्व आस्थापना सील करण्याचे आदेश दिले होते. परंतु, अवघ्या एका दिवसातच हॉटेल व्यवसायिकांनी आयुक्तांची भेट घेऊन थेट १५ दिवसांची मुदतवाढ मिळवली. परंतु पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना १ कोटी मिळाल्यानेच त्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप महाराष्ट नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
मनसेने केलेल्या या आरोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरातील ४५८ हॉटेल आस्थापना सील करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर झोपी गेलेले हॉटेल व्यवसायिक जागे झाले आणि त्यांनी गुरुवारी रात्रीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तर शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. तब्बल दोन तास त्यांची आयुक्तांबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, सहा महिन्यापूर्वी मुदतवाढ दिल्यानंतरही त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता अवघ्या १५ दिवसात ते कागदपत्रांची पूर्तता कशी करू शकतात असा सवाल मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. शिवाय त्यांना मुदतवाढ द्यावीच कशासाठी असा हल्लाबोलही त्यांनी चढविला आहे.
दरम्यान मंगळवारी त्यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दिलेली मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी केली. केवळ महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये हॉटेल व्यवसायिकांकडून मिळाल्यानेच ही मुदतवाढ दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधीत अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे.