ठाण्यात विजयादशमीनिमित्त पोलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:06 AM2020-10-26T00:06:43+5:302020-10-26T00:28:30+5:30
विजयादशमीनिमित्त ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने रविवारी पूजन करण्यात आले. एकाचवेळी ३० काडतुसे सोडणारी एकेएम आणि एकावेळी ३० राऊंड फायर होणारी एलएमजी आदी शस्त्रांस्त्रांचा यामध्ये समावेश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: विजयादशमीनिमित्त ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पोलिसांनी पूजन केले. यावेळी फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दसºयानिमित्त शुभेच्छा देऊन आपटयाच्या पानांचे वाटप केले.
प्रथेप्रमाणे ठाणे पोलिसांनी यंदाही शस्त्रांस्त्रांचे विधीवत पूजन केले. पोलीस आयुक्त फणसळकर यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राखीव पोलीस निरीक्षक सुभाष माने आदी अधिकाºयांनी हे पूजन केले. कोरोना संकट काळात आलेल्या यंदाच्या विजया दशमीला कोरोनापासून स्वत:चा व परिवाराचा बचाव करा, त्यासाठी योग्य ती काळजी घ्या. सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम आवर्जून पाळा, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्तांनी केले.थेट पोलीस आयुक्तांनी आपल्याला अशा प्रकारे आस्थेने शुभेच्छा दिल्यामुळे पोलीस कर्मचारी भारावले होते.
आयुक्तांनी शुभेच्छा दिल्यानंतर पोलीस बांधवांनीही आयुक्तांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. पोलीस कवायत मैदानामधील वाहनांचीही पूजा यावेळी करण्यात आली.
* असे झाले शस्त्रपूजन
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातील एसएलआर (सेल्फ लोडेड रायफल), कार्बाइन, नऊ एमएम पिस्टल, रिव्हॉल्व्हर आणि गॅसगन तसेच एकाचवेळी ३० काडतुसे सोडणारी एकेएम (अझाल्ट क्लासिनको माइल्ड) आणि एकावेळी ३० राऊंड फायर होणारी एलएमजी (लाईट मशिन गन) आदी शस्त्रांचे पोलीस आयुक्तांसह मुख्यालयातील कर्मचाºयांनी पूजन केले.