जितेंद्र कालेकर ठाणे : नाताळ तसेच थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागताची पार्टी जरुर करा... पण पार्टीच्या नावाखाली दारु पिऊन कुठेही हुल्लडबाजी करणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येऊरच्या ७५ बंगलेधारक तसेच हॉटेल चालकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी या बंगलेधारकांवर राहणार असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळामधील सर्वच ३५ पोलीस ठाण्यांचा आयुक्तांनी आढावा घेतला. नाताळ आणि ३१ डिसेंबर अर्थात २०१७ या वर्षाला निरोप देणारी आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्त येऊर, उपवन, कल्याणची खाडी किनारे, ढाबे आणि हॉटेल्समध्ये पाटर्यांचे बेत आखले जात आहेत.अनेकदा परवाना नसतांनाही अशा पाटर्यांचे आयोजन केले जाते. पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी, धांगडधिगा घालून हाणामारीचेही प्रकार सर्रास घडतात. यावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही करडी नजर ठेवणार आहेत. दोन वर्षापूर्वी येऊरमध्ये एका हॉटेलच्या आवारात पार्टी सुरु असतांना एकाने हवेत गोळीबार केला होता.या पार्श्वभूमीवर येऊरमध्ये विनापरवाना चालणाºया सर्व हॉटेल्सवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. विनापरवाना पार्टी करणाºयांवर टेहळणी करण्यासाठी ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२ निरीक्षकांची पथके तैनात केल्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी सांगितले.येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागात विशेष बंदोबस्त ठेवल्याची माहिती वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी दिली.त्यासाठी नाकाबंदीही करणार असल्याचे ते म्हणाले. तर महामार्ग, हॉटेल्स आणि मॉल्स कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास गस्ती पथकांची टेहळणी राहणार असल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे : पोलिसांची करडी नजर : थर्टी फर्स्ट साजरा करा.. पण जरा जपूनच!,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:21 AM