ठाणे: धुलीवंदनाच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या १७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली. तब्बल एक हजार ५४२ विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.
होळी तसेच धुलीवंदनाच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेने संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २४ आणि २५ मार्च अशी दोन दिवस नाकाबंदी करुन कारवाईची मोहीम सुरु केली. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटमध्ये सुमारे ५०० अधिकारी कर्मचारी यांच्या चमूने ४० ब्रिथ अॅनालायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली. याच तपासणीमध्ये मोटार वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राइव्हचे - १७३ खटले दाखल करण्यात आले. दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या ६६३ चालकांवर कारवाई झाली. तर विना हेलमेट दुचाकी चालविणाऱ्या एक हजार ५४२ चालकांंसह जादा प्रवासी नेणाऱ्या ३६५ रिक्षा चालकांवर सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.