ठाणेकरांना मालमत्ताकरात सवलत मिळणे कठीण, राष्ट्रवादी होणार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:26 AM2017-09-07T02:26:30+5:302017-09-07T02:26:55+5:30
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती.
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. परंतु, ठाण्यात मात्र शिवसेना नेत्यांच्या उदासीनतेमुळे महासभेत अद्यापही यासंदर्भातील प्रस्ताव येऊ शकला नाही. त्यामुळे ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत मिळावी, यासाठी आता राष्ट्रवादी आक्रमक होणार आहे. शिवसेनेवर त्यासाठी दबाव आणण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई आणि ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत दिली जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर, मुंबईत आता त्यादृष्टीने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. परंतु, ठाण्यात अद्यापही त्यादृष्टीने विचार झालेला दिसत नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या नेते मंडळींना छेडले असता आम्ही दिलेले वचन पूर्ण करू, असा दावा आजही केला जात आहे. परंतु, सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये उडत असलेल्या खटक्यांमुळे शिवसेनेने ठाण्यासाठी अशा संदर्भातील प्रस्ताव मंजूर जरी केला, तरी तो अंतिम मंजुरीसाठी शासनाच्या दप्तरी दाखल होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत शासन याला कितपत प्रतिसाद देते, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या दाव्यानुसार त्याला पालिका प्रशासन प्रतिसाद देईल, असे वाटत होते. परंतु, तसे काही घडलेच नाही. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातदेखील याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे ठाणेकरांना मालमत्ताकरात सवलत केव्हा मिळणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे. दुसरीकडे राष्टÑवादी मात्र याबाबत आक्रमक झाली असून वेळ पडल्यास यासंदर्भात शिवसेनेवर दबाव आणला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. यापूर्वीदेखील राष्टÑवादीने यासंदर्भात महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना आणली असता सत्ताधारी शिवसेनेने त्यावर चर्चा करणे टाळले होते. शिवसेना केवळ ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.