ठाणेकरांचा मुंबई प्रवेश महागला: टोलच्या दरांमध्ये ५ ते २५ रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 10:10 PM2020-10-01T22:10:40+5:302020-10-01T22:15:45+5:30
ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाऱ्या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या कामगारांच्या कपातीचे धोरण असल्यामुळे ही टोलवाढ सध्या लागू करु नये, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे अनेक खासगी कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांची कपात झाली आहे. तर अनेक ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. असे असतांनाही ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाºया टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी मुलूंड चेक नाका आनंदनगर येथे तसेच वागळे इस्टेट येथील मुलूंड चेक नाका येथे वाहन चालकांकडून टोल आकारला जातो. मुंबईमध्ये जाणाºया आणि मुंबईतून बाहेर पडणाºया वाहन चालकांकडून याठिकाणी टोल घेतला जातो. रस्ता दुरुस्ती आणि देखभाल करणाºया आयआरबी कंपनीकडे टोल आकारणीचा ठेका दिलेला आहे. या कंपनीला यापुढे टोल आकारणीमध्ये वाढ करण्याची मुभा राज्य सरकारने १ आॅक्टोंबरपासून दिली. त्यामुळे या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ झाली असून मासिक पासच्या रकमेतही वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच अनेक वस्तूंच्या किंमती त्यामुळे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अपुरे वेतन आणि नोकर कपातीमुळे नोकरदार मंडळी तर दुकाने वारंवार बंद राहण्यामुळे व्यापारी मंडळी हैराण आहेत. त्यातच या टोलवाढीमुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर टोलच्या वाढलेल्या दरांमुळे चालक आणि टोल वसूली करणारा कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोपरीतील आनंदनगर नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचेही गुरुवारी पहायला मिळाले. ठाणे मुंबई मार्गावर अनेक ठिकाणी खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातून होणाºया अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तर अनेकजण जायबंदी होत आहेत. अशा वेळी रस्ते दुरुस्ती करण्याऐवजी टोलमध्ये वाढीला राज्य शासनाने परवानगी देणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया अनेक चालकांनी व्यक्त केल्या आहेत.
असे आहेत टोलचे नविन दर:
* छोटी वाहने ३५ वरुन ४० रुपये
* मध्यम अवजड वाहने ५५ ऐवजी ६५ रुपये
* ट्रक आणि बसेस १०५ ऐवजी १३० रुपये
* अवजड वाहने १३५ वरुन १६० रुपये
* हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे.
* पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रु पयांऐवजी १५०० रु पये झाला आहे.
‘‘ राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दर तीन वर्षांनी होणारी ही टोल वाढ आहे. २०१२ मध्ये आधीच ठरलेल्या आधीसूचनेप्रमाणे ही टोलवाढ केली आहे. ’’
जयंत म्हैसकर, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सस लि. मुंबई.