- प्रज्ञा म्हात्रे, ठाणेयुरो आणि डॉलरचा रुपयाच्या तुलनेत विनिमय दर वाढल्याने आणि युरोपातील काही देशांत आर्थिक संकटामुळे संघर्ष सुरु असल्याने यंदा मे महिन्याच्या सुट्टीत परदेशी पर्यटनाकडे ठाणेकरांनी पाठ फिरवली आहे. भारतातील थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करण्याचे बेत आखणाऱ्या ठाणेकरांची सर्वाधिक पसंती काश्मीरला असल्याचे सहलींच्या मातब्बर आयोजकांनी ‘लोकमत’ला सांगितले. विशेष करून युवा वर्गात काश्मीरच्या पर्यटनाची क्रेझ आहे.उन्हाळी सुट्टी लागली की, फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. अनेकजण सहा महिने आगाऊ बुकिंग करतात. एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उकाड्यामुळे काहिली होत असल्याने आठ-पंधरा दिवस थंड हवेच्या ठिकाणी जाण्याकरिता पर्यटक आतूर असतात. प्रत्येकजण आपापल्या बजेटनुसार पर्यटन स्थळांची निवड करीत असतो. ज्यांचे बजेट अधिक असते ते मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग किंवा पॅरीस अशा विदेशवारीला जातात. मात्र बहुतांश ठाणेकरांचा ओढा भारतातील काश्मीर, सिमला, मनाली, दार्जिलिंग, कोडाइकॅनॉल आदी थंड हवेच्या ठिकाणांकडे असतो.गतवर्षी ठाणेकरांनी परदेशी सहलींना खूप पसंती दिली होती. मात्र, यंदा हा ट्रेण्ड कमी झाला आहे. डॉलर आणि युरोच्या रुपयाच्या तुलनेतील वाढत्या विनिमय दरामुळे यावर्षी विदेशापेक्षा भारतातल्या थंड हवेच्या ठिकाणांकडे जाण्याकडे कल आहे. काही बँका व वित्तसंस्था पर्यटनाकरिता कर्ज उपलब्ध करून देतात. त्यांनीही ठाणेकरांची विदेशी पर्यटनाकडे यंदा पाठ असल्याचे कबुल केले. भारतातील नंदनवन अर्थात काश्मीरमध्ये जाण्याकडे सर्वाधिक कल आहे. ६५ ते ७० टक्के ठाणेकरांनी काश्मीरचे बुकिंग केले असल्याचे सहल आयोजकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचाही हा परिणाम आहे. त्यापाठोपाठ सिमला, मनाली, दार्जिलिंग, सिक्कीम येथील बुकिंग झाले आहे. मोजकेच ठाणेकर युरोप, स्वित्झर्लंड, सिंगापूर, मलेशिया, थायलंडला जाणार आहेत. सर्वाधिक पसंती युरोपला आणि त्यानंतर सिंगापूर, मलेशिया, थायलंडला आहे. काश्मीरबद्दल नव्या पिढीमध्ये आकर्षण अधिक असल्याने त्यांचे पालकही त्याची निवड करीत असल्याचे ट्युलीप हॉलीडेजचे संचालक नरेश कोशे यांनी सांगितले.यंदा ठाणेकरांनी काश्मीरबरोबर हिमाचल प्रदेशात जाण्याला पसंती दिली आहे. एप्रिल-मे महिन्यातील बुकिंग फूल झाले आहे. आमच्याकडे ठाण्यातून जवळपास ६००हून अधिक पर्यटक भारतातील थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत. यंदा युरो, डॉलरचे दर वाढल्याने परदेशी सहलीकडे ओढा कमी आहे.- गार्गी आलेकर, प्रमुख, ठाणे शाखा, केसरी टूर्सयंदा ठाणेकरांनी काश्मीर, सिमला, मनाली त्याचबरोबर सिंगापूर, थायलंड, मलेशिया यांसारख्या स्थळांना पसंती दिली आहे. यंदा युरोपकडे जाण्याचा पर्यटकांचा अधिक कल आहे. सूट, उपलब्धता आणि हंगाम बघून परदेशी सहल करण्याचा पर्यटकांचा मानस असतो. - मयुरा बेलवले, प्रमुख, ठाणे शाखा, वीणा वर्ल्ड आमच्याकडे बुकिंग झालेल्यापैकी ६५ टक्के पर्यटकांचा ओढा हा काश्मीरकडे आहे. गेल्या दोन वर्षात काश्मीरमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. २० ते ५० वयोगटातील पर्यटक तोच पर्याय निवडतात. याखेरीज भारतातील हिमाचल प्रदेश व परदेशातील युरोप, सिंगापूर सारख्या ठिकाणी जाण्यासाठी बुकिंग केले असले तरी यंदा परदेशी सहलीकडे जाण्याचे प्रमाण कमी आहे. - नरेश कोशे,संचालक, ट्युलीप हॉलीडेज
आर्थिक संकटामुळे परदेशवारीकडे ठाणेकरांची पाठ
By admin | Published: April 13, 2016 1:45 AM