ठाणेकरांना आवडतो ९९९, फॅन्सी नंबरसाठी मोजतात साडेचार लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:13 AM2020-12-19T01:13:54+5:302020-12-19T01:14:02+5:30
परिवहनचा शुल्कवाढीचा प्रस्ताव; फॅन्सी क्रमांकाला मोठी मागणी
- जितेंद्र कालेकर
ठाणे : वाहनांना आपल्या पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी मोठी मागणी असते. जिल्ह्यात नऊ आणि नऊच्या पटीतील क्रमांक मिळविण्यासाठी चढाओढ असते. प्रसंगी तिप्पट रक्कम भरूनही ते मिळविले जातात. दोन वर्षांत अशा क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला ६५ कोटी ५१ ला २५ हजार ५०० रुपयांचे शुल्क ठाणेकरांनी मोजले आहे.
फॅन्सी क्रमांकाच्या शुल्कामध्ये सात वर्षांपूर्वी परिवहन विभागातर्फे तिप्पट वाढ झाली होती. आता पुन्हा ते वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अनेक कार, दुचाकीचे मालक हे आवडीच्या क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जिल्हाभरातून येत असतात. राजकीय नेते किंवा काही प्रतिष्ठित व्यक्तीही आपल्या वाहनाला क्रमांक एक, पाच किंवा नऊ हे क्रमांक मिळविण्यासाठी आग्रही असतात. अंकशास्त्रावर श्रद्धा असणारे, जन्मतारखेचा अंक किंवा त्याची बेरीज येणारा क्रमांक, काहींचा भाग्यांक क्रमांकासाठी ठरावीक क्रमांकाचा आग्रह असतो. काहींकडून दादा, पवार, राज या नावांवरून ७१७१, ४१४१, ४९१२, २१५१ या क्रमांकाची मागणी केली जाते. काहींना जुन्या वाहनाचा क्रमांक हवा असतो. क्रमांक एकसाठी सध्या कारला चार लाख, तर दुचाकीसाठी ५० हजारांचे शुल्क आकारले जाते. त्यानंतर ०००९, ००९९, ०७८६, ०९९९ व ९९९९ या क्रमांकांना दीड लाख रुपये कार, तर ५० हजार रुपये दुचाकीला आकारले जातात. त्यानंतर ०१११, ०२२२, ११११ आणि ५५५५ अशा क्रमांकांना ७० हजार रुपये मोटारकार, तर दहा हजार रुपये दुचाकीसाठी आकारले जातात.
एखाद्या क्रमांकाला मोठी मागणी आल्यास अधिकृत शुल्काव्यतिरिक्त वाढीव शुल्काचा डीडी बंद पाकिटातून संबंधितास आणण्यास सांगितले जाते. यात सर्वाधिक रकमेचा डीडी देणाऱ्यांना तो क्रमांक दिला जातो. दुचाकीसाठी आवडीचा क्रमांक उपलब्ध नसल्यास त्याला तिप्पट शुल्क आकारून कारच्या मालिकेतील क्रमांक दिला जातो.
- जयंत पाटील,
आरटीओ अधिकार, ठाणे
या नंबरना मागणी
ठाणे जिल्ह्यात नऊ तसेच नऊच्या पटीतील क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांची मोठी मागणी आहे. २०१९ मध्ये पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी ५६ कोटी ४६ लाख १३ हजार ५०० रुपये वाहनचालकांनी मोजले. तर यंदा (२०२०) नोव्हेंबरपर्यंत नऊ कोटी पाच लाख १२ हजार रुपये निव्वळ पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी ठाणेकरांनी अगदी कोरोनाकाळातही खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.