ठाण्यात रंगणार ४७ वे एकदिवसीय महानगर साहित्य संमेलन
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 6, 2024 01:15 PM2024-12-06T13:15:17+5:302024-12-06T13:15:56+5:30
ठाणे : तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि एक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवणाऱ्या ठाणे शहरात या ...
ठाणे: तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि एक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवणाऱ्या ठाणे शहरात या वर्षाला निरोप देताना महानगरसाहित्य संमेलन साजरे होणार आहे. महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे यांनी स्थापन केलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आणि मुंबई मराठी साहित्य संघयांच्या संयुक्त विद्यमाने ४७ वे एकदिवसीय महानगर साहित्य संमेलन रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टांकसाळे यांची निवड करण्यात आली आहे तर मुलांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘वयम’ या मासिकाचे संस्थापक आणि उद्योजक श्रीकांत बापट हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणेच्या सरस्वती मंदिर ( मुख्य शाखा,स्टेशन रोड,जिल्हा परिषदे समोर ) या वास्तूमधील महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल. भावेनगरीमध्ये हा साहित्य सोहळा साजरा करण्यात येईल.या ४७ व्या महानगरसाहित्य सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक रवी जाधव हे या महानगर साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत.
महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे साहित्य नगरीत होणाऱ्या या संमेलनातील सर्व कार्यक्रम जनकवी पी.सावळाराम मंचावर होतील.रविवार .१५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळात होणाऱ्या या संमेलनात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही मात्र नाव नोंदणी आवश्यक आहे असे आवाहन मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे. या संमेलनाच्या उद्गाटन समारंभाच्या वेळी संमेलनाध्यक्ष टांकसाळे हे ‘विनोदाचे जीवनातील स्थान’ या विषयावर व्याख्यान देतील.या एकदिवसीय महानगर साहित्य संमेलनामध्ये त्यानंतर ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मिकांत देशमुख यांची मुलाखत डॉ.विजय जोशी घेतील. त्यानंतर ‘ अभिजात मराठी ज्ञानभाषा कशी होईल? ’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादामध्ये प्रकाश परब, प्रा. डॉ.वीणा सानेकर, प्रा. अनघा मांडवकर, कादंबरीकार आणि कवी डॉ.बाळासाहेब लबडे सहभागी होतील.
या एकदिवसीय महानगर साहित्य संमेलनाचा समारोप ‘अंकुर कवितेचा’ या काव्य संमेलनाने होईल. युवा कवी संकेत म्हात्रे या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष असतील या काव्य संमेलनसाठी विविध महाविद्यायातील कवींनी पाठवलेल्या कवितांमधून काही निवडक कविता सादर करण्याची संधी नवोदित कवींना दिली जाईल. या एकदिवसीय संमेलनाच्या निमित्ताने मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तळमजल्यावर ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने २०२४ संपता संपता ठाण्यात एक दिवसीय साहित्य जागर होणार आहे.