...आणि ‘त्या’ लग्नघरात फुलले आनंदाचे वातावरण; ज्येष्ठ नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाली हरवलेली अंगठी

By प्रशांत माने | Published: December 6, 2022 06:59 PM2022-12-06T18:59:48+5:302022-12-06T19:05:19+5:30

पवारांमुळे हरवलेली अंगठी लग्नापुर्वीच मिळाल्याने विश्वकर्मा कुटुंबाचा जीव अक्षरश: भांडयात पडला.

The lost ring was found thanks to the honesty of the senior citizen in dombivali | ...आणि ‘त्या’ लग्नघरात फुलले आनंदाचे वातावरण; ज्येष्ठ नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाली हरवलेली अंगठी

...आणि ‘त्या’ लग्नघरात फुलले आनंदाचे वातावरण; ज्येष्ठ नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाली हरवलेली अंगठी

Next

डोंबिवली - दोन दिवसांवर आलेले बहिणीचे लग्न आणि त्याच्या खरेदीसाठी सुरू असलेल्या प्रवासात लग्नासाठी घेतलेली अंगठी आणि घडयाळ गहाळ झाल्याने सागाव येथे राहणा-या हरीश विश्वकर्मा यांच्या लग्नघरात चिंतेचे वातावरण पसरले पण मधुकर पवार या ज्येष्ठ नागरीकाने दाखविलेला प्रामाणिकपणा ‘त्या’ लग्नघरात पुन्हा आनंद घेऊन आला. एकिकडे चोरी, फसवणूकीच्या घटना घडत असताना एखादा दागिना हरवला तर तो परत मिळण्याची शक्यताही धूसरच असते. परंतू पवारांमुळे हरवलेली अंगठी लग्नापुर्वीच मिळाल्याने विश्वकर्मा कुटुंबाचा जीव अक्षरश: भांडयात पडला.

हरिश यांची बहीण मनिषा हीचे बुधवारी लग्न आहे. यानिमित्ताने हरीश आणि त्यांची पत्नी पुजा रविवारी सामान खरेदी करण्याच्या निमित्ताने पीएनटी कॉलनीत दुचाकीवरून आले होते. तेथून निघताना पुजा यांच्याकडील एक पिशवी खाली पडली. पण त्या दोघांना कळायच्या आत दोघेही दुचाकीवरून निघून गेले. दरम्यान गांधीनगर परिसरात राहणारे पण दुपारच्या सुमारास पीएनटी कॉलनी परिसरात मारूती मंदिराजवळ बसलेले ६१ वर्षीय मधुकर पवार यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनीही त्यांना ओरडून थांबविण्याचा प्रयत्न केला पण तोर्पयत विश्वकर्मा यांची दुचाकी दूर निघून गेली. ते दोघे परत येतील असे पवारांना वाटले पण बराच वेळ होऊनही ते न आल्याने पिशवीत नेमके काय आहे हे पाहीले असता त्यांना आतमध्ये एक सोन्याची अंगठी असलेला छोटा बॉक्स तर अन्य एका बॉक्समध्ये नवीन घडयाळ आढळले. घडयाळ खरेदीची पावतीही आढळुन आली त्यावर हरीश नाव आणि मोबाईल नंबर होता. तर दुसरीकडे खरेदी करताना केलेल्या प्रवासात अंगठी आणि घडयाळ असलेली पिशवी नेमकी कुठे पडली याबाबत विश्वकर्मा पती-पत्नीमध्ये संभ्रम होता. 

बहिणीचे लग्न दोन दिवसांवर आले असताना नवरदेवाला घालावयाची अंगठीच हरविल्याने कुटुंब चिंतेत पडले. दरम्यान सोमवारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात व्यस्त असलेल्या पवार यांनी मंगळवारी सकाळी थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि त्याठिकाणी असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे ती पिशवी सुपूर्द केली आणि घडलेला प्रकार सांगितला. बागडे यांनी पावतीवर असलेल्या मोबाईल क्र मांकावरुन हरीशला संपर्क साधला आणि त्याला याबाबत माहीती दिली. पोलिसांकडे पिशवी असल्याची माहीती मिळताच विश्वकर्मा पती-पत्नीने तत्काळ पोलिस ठाणे गाठले. अंगठी आणि घडयाळ मिळाल्याबाबत समाधान, आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत होता. मधुकर पवार आणि पोलिस अधिका-यांचे आभार मानले. बुधवारी आपल्या बहिणीचे लग्न असल्याचे सांगत त्यांना लग्नाची आमंत्रण पत्रिका यावेळी हरीश यांच्याकडून देण्यात आली.

Web Title: The lost ring was found thanks to the honesty of the senior citizen in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.