ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या माेठमाेठ्या तलावांचे मुबलक पाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी महानगरांसह आशिया खंडातील सर्वात माेठ्या एमआयीडीसींमधील कारखान्यांना पुरवण्यात येत आहे. मात्र या ग्रामीण, दुर्गम भागातील गांवपाडे मात्र दरवर्षांप्रमाणे यंदाही तीव्र पाणी टचाईला ताेंड देत आहे. प्रामुख्याने शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बृहन्मुंबईला, ठाणे या स्मार्ट सिटील शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यांजवळील भातसा, तानसा, माेडकसागर, मध्यवैतरणा आदी माेठमाेठ्या जलाशयातून पाणी पुरवठा हाेत आहे. मात्र या तालुक्यातील गावकरी, आदिवासी मात्र तीव्र पाणी टंचाईच्या झळांनी हाेरपळला जात आहे. या शहापूरच्या १४८ गांवपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. त्यामध्ये २६ महसूली गांवे, १२२ पाडे पाणी टंचाईच्या झळांनी त्रस्त आहेत. त्यांना तब्बल ३३ टँकरने पाणी पुरवठा हाेणे अपेक्षित आहे. मात्र अवघ्या ३० टँकरने अवघ्या १२६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. २०२१ ते २०२३ या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कमी अधीक दुप्पट टँकरने आजच्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित २२ गांवपाडे आजपर्यंतही टँकरच्या पाणी पुरवठयापासून वंचित दिसून येत असल्याचे वास्तव शहापूरमध्ये भयानक दिसून येत आहे.
शहापूरच्या आपटे, मधलीवाडी, खंडवीवाडी, मानेखिंड, आंबेखाेर,अस्नाेली, दहिवली, मसणेपाडा, कवऱ्याची वाडी, मुसईवाडी, तर खासदार दत्तकगांव म्हणून नावारूपाला आलेले विहिगांवजवळील निरगुडवाडी आदी दाेन गावे १७ पाड्यांना तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहेत. त्यांना तीन टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा म्हणून प्रस्तावही देण्यात आलेला आहे. मात्र या गावकऱ्यांचा प्रस्ताव निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली दुर्लक्षित असून धुळखात पडून आहे. या गावपाड्यांसह तीव्र पाणी टंचाई २२ गांवपाड्यांना असून ते टँकरच्या प्रतिक्षेत आहेत.