रेल्वे प्रवासात चोरी: ठाण्यातील महिलेला तब्बल २० वर्षांनी रेल्वे पोलिसांनी सुपूर्द केले दोन लाखांचे सोने
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2020 10:00 PM2020-09-18T22:00:25+5:302020-09-18T22:02:53+5:30
एका महिलेचे दागिने रेल्वेत चोरीला गेले होते. ही चोरी उघडकीस आली. मात्र, चुकीच्या पत्त्यामुळे पोलिसांना गेली २० वर्षे तक्रारदार महिलेचा शोध घ्यावा लागला. अखेर १८ सप्टेंबर रोजी या महिलेचा शोध घेऊन तिचे दोन लाख ३० हजारांचे सोने तिला सुखरुप परत केल्यामुळे तिने समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एरव्ही, चोरी किंवा दरोडा पडल्यानंतर पोलीस उशिरा पोहचतात. तक्रारही नोंदवून घेत नाहीत. घेतलीच तर तपासाबाबतही प्रश्नचिन्ह असते. असा एक समज आहे. परंतू, ठाणे रेल्वे पोलिसांनी तर रेल्वेतील चोरीनंतर आरोपीही तात्काळ शोधला. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला. पण, संबंधित तक्रारदार महिलेच्या चुकीच्या पत्यामुळे या तिचे दागिने पोलीस ठाण्यातच होते. गेली वर्षभर ठाणे रेल्वे पोलिसांनी शोध घेऊन शुक्रवारी निर्मला राधाकृष्णन (६३, रा. खोपट, ठाणे) यांना त्यांचे दोन लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने सुपूर्द केले. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केले.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सेंट्रल कॉम्पलेक्स असा दप्तरी पत्ता असलेल्या निर्मला राधाकृष्णन या २००१ मध्ये रेल्वेने प्रवास करीत असतांना त्यांचे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्याच वर्षी ठाणे रेल्वे पोलिसांनी यातील चोरट्याला या सर्वच मुद्देमालासह अटक केली. त्याला २००३ मध्ये या प्रकरणात शिक्षाही झाली. त्याचवेळी या तक्रारदार महिलेचे दागिने तिला हस्तांतरण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परंतू दप्तरी नोंद असलेल्या पत्यावर निर्मला उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे पोलिसांनी त्यांचा मोठया चिकाटीने शोध सुरुच ठेवला. सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल यांना त्या संबंधित पत्त्यावर मिळाल्या नाही. पोलीस नाईक बागुल यांनी गॅस एजन्सीमार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या न मिळाल्याने पोलीस ठाण्यातील कागदपत्रांच्या आधारे कोपरखैराणे येथीली टेलिफोन एक्सचेंजमधून त्यांचा दूरध्वनी क्रमांकांच्या आधारे त्यांचा पत्ता मिळविण्यात आला. तरीही त्यांचा शोध लागला नाही. अखेर सेंट्रल कॉम्प्लेक्स, परेरा नगर, खोपट, हंस नगर हा ठाण्याचा पत्ता त्यांना मिळाला. तिथेही त्या मिळाल्या नाही. मात्र तेथील सुरक्षा रक्षक लक्ष्मण जंगम यांनी जुन्या रेकॉर्डच्या आधारे त्यांचा मोबाइल क्रमांक दिला. त्याच आधारे ठाण्यातील देवदयानगर येथील सध्याचा त्यांचा पत्ता मिळाला. त्याची खात्री झाल्यानंतर गेली अनेक वर्षे जप्त असलेला मुद्देमालातील दोन लाख ३० हजारांची ४८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे आणि पोलीस नाईक ए. जी. बागुल यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०२० रोजी निर्मला राधाकृष्णन यांना परत करण्यात आली.
* अनेक छोटे धागे जोडून तब्बल वीस वर्षानंतर पोलिसांनी हा मौल्यवान मुद्देमाल निर्मला यांना सुपूर्द केल्याने त्यांना अनपेक्षित सुखद धक्काच बसला. त्यांनी कोर्ट कारकुन सांबर, मुदेमाल कारकुन व्ही .एस मदने, पोलीस नाईक एम. के. बिराजदार आणि कॉन्स्टेबल नाटेकर यांचे आभार व्यक्त करून रेल्वे पोलीसांच्या कामिगरीचे विशेष कौतुक केले. येत्या काही दिवसातच मुलीचे लग्न असल्यामुळे या दागिन्यांचा त्यासाठी उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.