...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:36+5:302021-07-24T04:23:36+5:30

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना ...

... then laughter can be felt on the soul! | ...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

Next

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कल्याणमधील धोकादायक दरडींचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. येथील पत्रीपुलानजीकच्या नेतिवली व कचोरे, हनुमाननगर टेकडीवर माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जातात, परंतु ठोस कृतीअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. दरम्यान, प्रशासनाची उदासीनता व रहिवाशांच्या घरे न सोडण्याच्या अट्टहासामुळे येथील धोका कायम आहे.

कधी काळी हिरव्यागार असलेल्या या टेकड्यांवरील अतिक्रमणांमुळे त्यांचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात आले आहे. दरडी कोसळण्याच्या भीतीने दरवर्षी रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या टेकड्यांवर आणि पायथ्याशी सुमारे ४५० ते ५०० कुटुंबे येथे राहत आहेत. नेतिवलीपेक्षा कचोरे टेकडीवर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. या टेकडीवरील काही मोठे दगड खालच्या दिशेने सरकले आहेत, परंतु झाडांमुळे ते अडल्याने ते खालील घरांवर कोसळलेले नाहीत. येथील होणारे भूस्खलन पाहता ते दगड भविष्यात हानी पोहोचविण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तरी टेकडीवरून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हाही टेकडीखाली येऊन राहण्यास सांगितले जाते. मात्र, या सूचनांकडे कानाडोळा केला जात आहे. गेली अनेक वर्षे येथे वास्तव्य असल्याने घर न सोडण्याच्या रहिवाशांच्या मानसिकतेमुळे धोका कायम आहे.

केडीएमसीने धोकादायक असलेल्या भागात लोखंडी बॅरिकेड्स लावल्या आहेत. परंतु, तो भाग मुरूमाचा असल्याने हा उपाय कितपत टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. येथील स्थानिक माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु हे कामही अर्धवट आहे. प्रशासनाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

----------

दरड कोसळण्याच्या घटना

- २००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते. तर २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते.

- मार्च २०११ च्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये, तर १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. मात्र, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

-----------

कचोरे टेकडीच्या परिसरातील १५० कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एनडीआरएफच्या टीमने तेथे भेट देऊन तेथील रहिवाशांना आवाहन केले आहे. परंतु, रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- वसंत भोंगाडे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी

----------------------

Web Title: ... then laughter can be felt on the soul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.