अनिकेत घमंडी, डोंबिवलीसंघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते. त्यांनीही तसे होणार नसल्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत तसे काहीच झाले नाही. समितीने पाठिंबा दिलेल्या भाजपाच्या उमेदवारांसह त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्या समितीची समेट समिती झालीच, असा आरोप करून ठाकरेंचे शब्द खरे ठरले, अशीटीका मनसेचे राज्य चिटणीस आणि कल्याण जिल्हाप्रमुख राजू (प्रमोद) पाटील यांनी केली. २१ जागांपैकी १७ जागांवर भाजपासह संघर्ष समिती उमेदवारांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवून निवडणूक रिंगणात असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आधीपासूनच त्या गावांमधील उमेदवारांना अंडरग्राउंड करून ठेवले असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातच संघर्ष समितीने असे धोरण घेतल्याने मनसेनेही त्यांचे तीनपैकी दोन उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. शनिवारी ठाकरे जेव्हा डोंबिवलीत आले होते, तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे सांगितले होते. त्यावर, त्यांनी समितीला वरील बोल सुनावून तसे केले नाही तर पाठिंबा कायम असेल, तसेच त्यासंदर्भातला सर्वस्वी निर्णय हा पाटील घेतील, असे मीडियासमोर स्पष्ट केले होते. त्यानुसार, निवडणूक अर्ज भरले गेले. ते मागे घेण्यासंदर्भात काम सुरू झाले. समिती त्यासाठी ठिकठिकाणी दबावतंत्र, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला बसपाच्या उमेदवार बिनविरोध आल्यावर फाटा फुटल्याने शिवसेनेने तातडीने त्यांचे उमेदवार सुरक्षित ठिकाणी नेले. अशा तणावासह गंभीर स्थितीत शुक्रवारी संघर्ष समिती काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी ३ ला चित्र स्पष्ट झाले आणि समितीने काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा कानोसा घेऊन मनसेनेही त्यांच्या ३ उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नका, असा संदेश दिला होता. त्यापैकी काटई आणि नांदिवलीच्या उमेदवाराने ते मागे घेतले नाहीत, तर हेदुटणेच्या मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला.
केडीएमसीत संघर्षची अखेर ‘समेट समिती’ झालीच
By admin | Published: October 17, 2015 1:49 AM