अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दोन्ही कोविड केअर सेंटरमध्ये अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्या नसली तरी त्या ठिकाणची सेवा अविरतपणे सुरू राहणार आहे. रुग्णसंख्या कमी असल्याकारणाने दोनपैकी एक कोविड केअर सेंटर सुरु ठेवण्यात आले असून, दुसरे सेंटर रुग्णसेवा वाढल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने ६०० बेडसंख्या असलेल्या डेंटल रुग्णालयात कोविड सेंटर सुरू ठेवले असून त्याच्याशेजारीच सर्वोदय शाळेतही १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी असल्याने शाळेतील कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले असून, ६०० बेडची संख्या असलेल्या डेंटल हॉस्पिटलमधील पॉइंट केअर सेंटरमध्येच उपचार केले जात आहेत. डेंटल हॉस्पिटलमधील सेंटरमध्ये ५४५ बेड हे ऑक्सिजनचे असून ५५ बेड्स हे आयसीयू कक्षातील आहेत. मात्र गेल्या महिन्याभरापासून रुग्णांची संख्या कमी झाल्याने डेंटल महाविद्यालयात सर्व रुग्णांवर उपचार केले जातात.
आजच्या घडीला ६१ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णालयाची जबाबदारी एका खासगी संस्थेला देण्यात आली असून, त्या संस्थेने काही प्रमाणात कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या कमी केली आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पुन्हा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अंबरनाथ शहरात सरासरी २० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील सात हजार ६०० रुग्णांवर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले आहेत.