ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील १३ सफाई कामगारांची महिनाभर दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:33 AM2020-05-03T01:33:53+5:302020-05-03T01:34:12+5:30
प्रशासनाने बजावल्या नोटिसा। निलंबनाची टांगती तलवार
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील १३ सफाईकामगार मागील महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून या दांडीबहाद्दर सफाई कामगारांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. यानंतरही ते कामावर येत नसतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे रु ग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय हे कोविड १९ चे विशेष रु ग्णालय म्हणून जाहीर झाल्यानंतर त्यात केवळ कोरोनाबाधित रु ग्णांवर उपचार करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला रु ग्णालयात सात कक्षांसह एका अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित रु ग्ण उपचार घेत आहेत. या विभागांत सद्यस्थितीत ३० कामगार तीन शिप्टमध्ये काम करून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामगारांव्यतिरिक्त असलेले १३ सफाईकामगार मात्र गेल्या महिनाभरापासून गैरहजर असल्याने त्यांची ही जबाबदारी या ३० कामगारांवर येऊन पडली असून यापैकी बहुतांश कामगारांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असूनदेखील ते कोरोनायुद्धात योद्धापणे आपली कर्तव्य बजावत आहेत.
रु ग्णालयातील १३ कामगार गेल्या महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीसुद्धा ते हजर होत नसतील तर त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. - डॉ. कैलाश पवार, जिल्हा चिकित्सक, ठाणे