ठाणे : मुंबई, पुण्यात घरफोड्या करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या चौकशीतून सात गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे शाखेकडून घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना राजेशकुमार घोष ऊर्फ राजू चिकना नावाच्या सराईत घरफोड्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला मुंब्रा-कौसा येथून ताब्यात घेतले असता त्याने मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.त्याच्या चौकशीतून पोलिसांना या टोळीतील आणखी काही साथीदारांचा तपशील मिळाला. त्यानुसार, कौसा येथील इरफान नझीम शेख, अशरफ मकबुल शेख ऊर्फ माचो, मोहम्मद अली अमीर शेख, सानू अतिक खान ऊर्फ छोटू, कल्याण पूर्वेतील भालगाव येथील अंकुश आश्रुबा जाधव, उल्हासनगरातील आशेळे येथील मोहम्मद हुसैन अब्दुल करीम चौधरी ऊर्फ इम्रान आणि इजाज अहमद अब्दुल करीम चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, दोन मोटारसायकल आणि ३३४ ग्रॅम दागिन्यांसह सात लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात आरोपी इजाज अहमद याच्याविरुद्ध १९, अंकुश जाधव याच्याविरुद्ध १६, तर राजू चिकना याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मानपाडा, कोनगाव, उल्हासनगर, कुलाबा आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यांसह बाजारपेठ पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात आठ सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 5:20 AM