अरविंद म्हात्रे, चिकणघरशेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली. यामुळे आता संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात सरळ सामना होणार आहे. येथील २१ प्रभागांपैकी ११३ अणि १०५ या दोन प्रभागांतील उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे आणि प्रभाग ११४ आणि ११९ या दोन प्रभागांत कोणीच अर्ज न भरल्याने एकूण चार प्रभागांत निवडणूक होणार नसून २१ पैकी १७ प्रभागांतच ती होईल. मात्र, शिवसेना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, आरपीआय, समाजवादी पक्ष असे सर्वपक्षीय असल्याने १७ जागांसाठी सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना आणि समिती दोघेही आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आपला महापौर बसवण्यासाठी २७ गावांवर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिवसेनेला आता ही निवडणूक फार सोपी जाणार नाही, असे वातावरण करण्यात संघर्ष समिती आधीच यशस्वी झालेली आहे. २१ पैकी केवळ १७ जागांवरच्या लढाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. >> निवडणुकीनंतर दिसणार सेनेची ताकद?१५ तारखेपासून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून समितीच्या लोकांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच शिवसेना नेत्यांनी अपल्या उमेदवारांना बाहेर हलविल्याने समितीचा अपेक्षाभंग झाला. यामुळे आता लढण्यावर भर देऊन किमान १५ जागा समिती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, २७ गावांत शिवसेनेची ताकद निवडणुकीनंतर दिसेल, असे सूचक उद्गार शिवसेनेच्या नेत्यांनी काढले.
‘त्या’ २७ गावांत आता लढाई अटळ
By admin | Published: October 17, 2015 1:50 AM