दोन घरफोडया करुन मोबाईल आणि रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:20 PM2021-02-01T23:20:51+5:302021-02-01T23:22:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करुन पसार झालेल्या पवन राम (२९, रा. रामनगर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करुन पसार झालेल्या पवन राम (२९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट, सीपी तलाव येथील सुनिल निशाद (२६) यांच्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात २९ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० ते ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वा. च्या सुमारास अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १७ मोबाईल आणि दोन डिस्प्ले असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती. तर वागळे इस्टेट, शिवाजीनगर भागातील सचिन सूर्यवंशी यांच्या धन्वंतरी मेडिकल दुकानातूनही २९ जानेवारी रोजी रात्री ते ३० जाानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान चोरटयांनी शटर तोडून दोन हजारांची रोकड लंपास केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पवन याच्यासह तिघांची नावे तपासात समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि सुनिल शिंदे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये या तिघांनाही ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी या दोन्ही चोऱ्यांची कबूली दिली. त्यांच्याकडून १७ मोबाईल आणि दोन हजारांची रोकड असा एक लाख चार हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी विजय डिंग याने भांडूप भागातही चोरी केल्याचे आढळले असून तो तेथील चोरीच्या गुन्हयातही वॉन्टेड आहे. या तिघांनाही ठाणे न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.