उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार; एकाच विकास कामासाठी तीन निधी, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप
By सदानंद नाईक | Published: October 4, 2023 06:19 PM2023-10-04T18:19:02+5:302023-10-04T18:19:44+5:30
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग रस्त्याच्या डिव्हाईडर ठेका व निकृष्ट कामावरून वादात सापडला आहे.
उल्हासनगर: शहरातील एकाच विकास कामासाठी वेगवेगळ्या निधीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याने, महापालिका बांधकाम विभागातील सावळागोंधळ उघड केला. याबाबतची माहिती आपण बांधकाम विभागाला लेखी मागितली असून माझा ५० लाखाचा आमदार निधी दुसऱ्याच मतदारसंघात वापरल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग रस्त्याच्या डिव्हाईडर ठेका व निकृष्ट कामावरून वादात सापडला आहे. या दरम्यान एकाच विकास कामासाठी महापालिका बांधकाम विभाग राज्य शासन, महापालिका व आमदार निधी अशा तीन निधीचा वापर करीत आहे. असा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी करून बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे केले. उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व या तीन मतदारसंघात उल्हासनगर शहर विभागले आहे. कॅम्प नं-१,२ व ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप गावाचा समावेश उल्हासनगर मतदारसंघात होतो. तर अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात शहर पूर्वेतील कॅम्प नं-४ व ५ परिसराचा समावेश होतो.
शहराच्या विकासासाठी आमदार कुमार आयलानी यांच्याप्रमाणे आमदार बालाजी किणीकर व गणपत गायकवाड हेही आमदार निधी देतात. आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्व मतदारसंघात उल्हासनगरातील काही भागाचा समावेश होत असून त्या विभागाच्या विकासासाठी आमदार गायकवाड निधी देतात. मात्र ज्या ठिकाणी गायकवाड यांचा आमदार निधी दिला. त्या निधी पैकी ५० लाखाचा निधी गायकवाड ऐवजी आमदार बालाजी किणीकर यांच्या मतदारसंघात वापरत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना दिली. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी अधिक चौकशी केली असता, एकाच विकास कामासाठी बांधकाम विभाग राज्य शासन, महापालिका व आमदार निधी आदी तीन निधीचा वापरत करीत असल्याची माहिती मिळाली. याप्रकारचा भांडाफोड करण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेला आमदार निधी कोणत्या मतदारसंघात वापरला?. यापूर्वी त्या कामासाठी इतर निधी वापरला का? आदी माहिती बांधकाम विभागाला मागितली आहे.
आमदार गायकवाड यांचे पत्र आले
आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीचा वापर कुठे केला. याबाबतची माहिती लेखी मागविली आहे. अशी माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच एका विकास कामासाठी वेगवेगळे तीन निधी वापरले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.