घराची भिंत कोसळून तिघे जखमी, भिवंडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:43 AM2020-09-03T01:43:27+5:302020-09-03T01:43:39+5:30
जूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली.
भिवंडी : अंजूरफाटा, शिवाजीनगर येथे एका बैठ्या घराची भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. या दुर्घटनेत घराशेजारील गल्लीत ड्रेनेज लाइनसाठी खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांसह एक युवक जखमी झाला. ढिगाºयाखाली अडकलेल्या दोन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंजूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत खोदकाम करणारे विशाल, अनुष व विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर ढिगाºयाखाली अडकून पडले. त्यावेळी त्या ठिकाणाहून जाणारा युवक गणेश हा जखमी झाला. विष्णुदेवाने स्वत:ची सोडवणूक करून घेतल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ढिगाºयाखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुखरूप सुटका केली.
कविता चंद्रमौळी एलगट्टी या महिलेचे हे घर असून ती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने त्या बचावल्या. मागील तीन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्यामुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इमारतीमधील व्यक्तींकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली.
दरम्यान, घटनास्थळी भिवंडी महापालिका उपायुक्त डॉ. दीपक सावंत, सहायक आयुक्त नूतन खाडे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे
यांनी भेट देत मदतकार्याची माहिती घेतली.